बाखराबाद सामूहिक हत्याकांडातील तीन आरोपींना दुहेरी फाशी

बाखराबाद सामूहिक हत्याकांडातील  तीन आरोपींना दुहेरी फाशी

प्रातिनिधिक फोटो

बाखराबाद येथे घडलेल्या सामूहिक हत्याकांडातील तीनही आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या तिघांनी १४ एप्रिल २०१४ रोजी त्यांचे नातेवाईक असलेल्या चौघांची हत्या केली होती.हे हत्याकांड केवळ २ एकर शेतीच्या वादातून घडले होते. गुन्हेगारांच्या मनात धडकी भरविणारा हा निकाल तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांनी दिला. या खटल्यात न्यायालयाने तिघांनाही विविध कलमान्वये दंड ही ठोठावला असून दंडाची रक्कम मृतकांवर अवलंबून असणार्‍यांना देण्यात येणार आहे. तसेच पीडितांना ‘व्हिक्टीम कम्पेनसेशन स्कीम’ अंतर्गत ही नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करावे, असे आदेश न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले आहेत.

उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या बाखराबाद येथे १४ एप्रिल २०१४ रोजी २ एकर शेत जमिनीच्या वादातून चार नातेवाइकांचे हत्याकांड घडले होते. विश्वनाथ माळी, वनमाला माळी, योगेश माळी व राजेश माळी हे यामध्ये मृत्युमुखी पडले होते. त्यांचे नातेवाईक असलेले गजानन माळी, नंदेश माळी व दीपक माळी त्यांची हत्या केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उरळ पोलिसांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या खटल्याची सुनावणी तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात झाली. सरकारकडून जिल्हा सरकारी वकील राजेश्वर देशपांडे यांनी युक्तिवाद केला.

First Published on: November 24, 2018 5:01 AM
Exit mobile version