हरभजन सिंगची राजकीय इनिंग सुरू, आम आदमी पार्टी राज्यसभेवर पाठवणार

हरभजन सिंगची राजकीय इनिंग सुरू, आम आदमी पार्टी राज्यसभेवर पाठवणार

हरभजन सिंगचे मत

नवी दिल्लीः भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांनी क्रिकेटच्या खेळपट्टीवर अप्रतिम कामगिरी केल्यानंतर आता ते आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करत आहे. आम आदमी पक्षाने (आप) त्यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. पंजाबमध्ये AAP ने दणदणीत विजय मिळवला, त्यानंतर माजी फिरकीपटूला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचे ठरवण्यात आले. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यसभेच्या सदस्यांची निवड होणार आहे. निवडणूक आयोगाने पंजाबमधील राज्यसभेच्या सातपैकी पाच जागांसाठी अधिसूचना जारी केलीय. 21 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, 31 मार्चला निवडणूक होणार आहे.

हरभजनने भगवंत मान यांचे अभिनंदन केले होते

पंजाबमध्ये ‘आप’च्या दणदणीत विजयानंतर 41 वर्षीय हरभजन सिंग यांनी ट्विट करून भगवंत मान यांचे अभिनंदन केले होते. हरभजन म्हणाले की, माझे मित्र भगवंत मान आमचे नवे मुख्यमंत्री झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आहे. आम आदमी पक्षाला एकतर्फी विजय मिळाल्याची माहिती आहे. एकूण 117 जागांपैकी ‘आप’ला 92 जागा मिळाल्यात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान म्हणाले होते की, हा संपूर्ण पंजाबच्या विश्वासाचा विजय आहे. आम्हाला आशा आणि लोकांचा विश्वास असलेला जनादेश मिळाला आहे.

राजकारणातील प्रवेशाची चर्चा बराच काळ सुरू होती

41 वर्षीय हरभजनने डिसेंबर 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. हरभजनच्या निवृत्तीची घोषणा होताच त्याच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते, मात्र कोणत्याही पक्षाचा उल्लेख केला नव्हता. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना मी ओळखतो, असे ते विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणाले होते. मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला तर ते अगोदर जाहीर करेन. मी पंजाबची सेवा करेन. मग ते राजकारणातून असो वा अन्य कोणत्याही माध्यमातून असो. मला वेगवेगळ्या पक्षांकडून ऑफर आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

अशी होती हरभजनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

हरभजनने भारतासाठी 103 कसोटीत 417, 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 आणि 28 टी-20 सामन्यांमध्ये 25 बळी घेतले. त्यांनी एकूण 711 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या. हरभजनने 1998 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारताकडून मार्च 2016 मध्ये ढाका येथे संयुक्त अरब अमिरातीविरुद्धचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, जो एक T20I होता. 2007 मध्ये T20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता.

संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनाही संधी

हरभजन सिंग, राघव चढ्ढा, डॉ. संदीप पाठक, ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक कृष्णा प्राण आणि संजीव अरोरा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल यांची नावे निश्चित करण्यात आलीत. दिल्लीचे प्राध्यापक डॉ. संदीप पाठक यांच्याशिवाय चौथे नाव कृष्णा प्राण यांचे आहे. कृष्णा प्राण हे ब्रेस्ट केअर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आहेत. पंजाबमध्ये राज्यसभेच्या सात जागा रिक्‍त होत आहेत, त्यापैकी 5 जागांची मुदत 9 एप्रिल रोजी संपत आहे. या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. संदीप पाठक अनेक वर्षांपासून पडद्याआडून पंजाबमध्ये मोक्याची भूमिका बजावत आहेत.


हेही वाचाः हिंदुत्वावरून पुन्हा एकदा सेना-भाजप आमनेसामने, आता संजय राऊत म्हणतात…

First Published on: March 21, 2022 12:06 PM
Exit mobile version