ऑस्ट्रेलियात दोन हेलिकॉप्टर हवेत एकमेकांवर धडकले; चार जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियात दोन हेलिकॉप्टर हवेत एकमेकांवर धडकले; चार जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाः ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर दोन हेलिकॉप्टरची हवेतच टक्कर झाल्याची घटना सोमवार घडली. एक हेलिकॉप्टर उड्डाण घेत होते तर दुसरे उतरत होते. दोन हेलिकॉप्टरमध्ये एकूण १३ जण होते. त्याताली चार जणांचा मृत्यू झाला. तिघे गंभीर जखमी झाले तर सहा जण किरकोळ जखमी झाले.

सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हा अपघात झाला. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध गोल्ड कोस्ट समुद्रकिनारी हा अपघात झाला. हा अपघात समुद्राच्या मध्यभागी झाला आहे. तेथे आजूबाजूला बोटी आहेत. त्यामुळे तेथे मदतकार्य पोहोचवणे शक्य होत नव्हते. अपघाताचे नेमके कारण लगेच सांगणे कठीण आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. एक हेलिकॉप्टर उड्डाण घेत होते तर दुसरे उतरत होते. एकाच वेळी ते समोरासमोर आल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जमीनीवर उतरणारे हेलिकॉप्टर सुखरुपरित्या उतरले आहे. उड्डाण घेणाऱ्या हेलिकॉप्टरचे नुकसान झाले आहे. या हेलिकॉप्टरचे अवशेष समुद्रात पडले होते. अपघात झाला त्यावेळी मोठा आवाज झाला. समुद्रकिनारी असलेले पोलीस व स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरु केले.

ऑस्ट्रेलियाच्या वाहतूक सुरक्षा विभागाचे मुख्य आयुक्त अन्गस मिकेल यांनी सांगितले की, या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. वाहतूक सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत. तसेच या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचे काम सुरु आहे. हेलिकॉप्टरचे अवशेष व तेथील नकाशे घेण्याचे काम सुरु आहे. ज्या नागरिकांनी हा अपघात बघितला त्यांनी तपास अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा अपघात कशामुळे घडला त्याची चौकशी करुन त्याचा अहवाल सहा ते आठ आठवड्यात येईल, असे मुख्य सुरक्षा आयुक्त मिकेल यांनी सांगितले.

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या. कारण येथील मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होती. पादचारी व खासगी वाहनांना मार्ग मोकळा करण्याचे आवाहन करण्यात आले. अपघात झालेले ठिकाण हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने येथे पर्यटकांची गर्दी होती.

 

First Published on: January 2, 2023 6:23 PM
Exit mobile version