स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राजधानीमध्ये कडक सुरक्षा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राजधानीमध्ये कडक सुरक्षा

फोटो सौजन्य - red fort

७२व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. उद्या अर्थात १५ ऑगस्ट रोजी ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त घातपाताची शक्यता लक्षात घेता राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ल्याभोवती लष्कराची कडक सुरक्षा व्यवस्था असून तब्बल ७० हजार सुरक्षा रक्षक डोळ्यात तेल घालून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. शिवाय, अॅन्टी एअरक्राफ्ट गन देखील तैनात करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दहशतवादी घातपात करू शकतात असा अहवाल गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत.

जबरदस्त सुरक्षा व्यवस्था

७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याभोवती १० हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मंत्री, महत्त्वाच्या पदांवरचे प्रशासकीय अधिकारी, राजदूत यांच्या सुरक्षेसह सामान्य माणासांच्या सुरक्षेवर देखील विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. लाल किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून पतंग उडवायला देखील सकाळी ११ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहेत. ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ही लाल किल्ल्यावर असून २०० सीसीटीव्ही कॅमेरे लाल किल्ला परिसरामध्ये लक्ष ठेवणार आहेत. दिल्ली पोलीस दलातील ३६ महिला अधिकारी सुरक्षेवर नजर ठेवणार आहेत. संशयास्पद दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीची कसून चौकशी करण्यात येत आहे. तर, दिल्लीमध्ये पॅराग्लायडींग, एअर बलुनवर देखील बंदी घालण्यात आली आहे. गाड्यांच्या पार्किंगवर देखील सुरक्षा रक्षकांचे विशेष लक्ष आहे. दरम्यान दिल्ली मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे दिल्ली मेट्रोने स्पष्ट केले आहे.

वाचा – दिल्लीमध्ये हाय अलर्ट, स्वातंत्र्यदिनी होऊ शकतो अतिरेकी हल्ला!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे लक्ष

७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना काय संदेश देतात? याकडे देशवासियाचे डोळे लागून राहिले आहेत. तर राजपथावर तिनही सुरक्षा दलांचे संचलन होणार आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे हे क्षण पाहण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्सुक आहे.

First Published on: August 14, 2018 6:36 PM
Exit mobile version