हिंडेनबर्गचा आणखी एक अहवाल, ‘ब्लॉक इंक’वर फसवणुकीचा आरोप; कंपनीचे शेअर्स गडगडले

हिंडेनबर्गचा आणखी एक अहवाल, ‘ब्लॉक इंक’वर फसवणुकीचा आरोप; कंपनीचे शेअर्स गडगडले

Hindenburg Research on Block ink company

Hindenburg Report on Block ink Company | नवी दिल्ली – अदानी समूहातील गैरव्यवहार बाहेर काढल्याने चर्चेत आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चने आता आपला मोर्चा वळवला आहे ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांच्याकडे. हिंडेनबर्गने जॅक डोर्सी यांच्या ब्लॉक इंक कंपनीवर (Black Ink Company) फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गचा हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर जॅक डोर्सी कंपनीचेही शेअर्स घसरले आहेत.

हेही वाचा – हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ब्लॉक इंक कंपनीने युजर्स वाढवून दाखवले आहेत, असा आरोप हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर कंपीनच्या शेअर्समध्ये तब्बल १८ टक्क्यांची घसरण झाली. हिंडेनबर्गने ब्लॉक इंक कंपनीची दोन वर्षे तपासणी केली. या कंपनीने तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. ४० ते ४५ टक्के खाती बनावट केली असून ही सर्व खाती एकाच व्यक्तीशी संबंधित आहेत. तसंच, सत्य माहिती लपवून जॅक डोर्सी यांच्या कंपनीने गुंतवणूकदारांची दिशाभूल केली, असे विविध आरोप हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आले आहेत.

गौतम अदानींवरील आरोप काय?

हिंडेनबर्ग रिसर्चने 25 जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत 32 हजार शब्दांचा अहवाल जारी केला होता. या अहवालाच्या निष्कर्षांमध्ये 88 प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतला आहे. शेअर्सच्या वाढत्या किमतीमुळे अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांची संपत्ती तीन वर्षांत 120 अब्ज डॉलर्स झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या कालावधीत समूहातील 7 कंपन्यांचे शेअर्स सरासरी 819 टक्क्यांनी वाढले आहेत. हिंडेनबर्गचा हा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स कोसळले. अनेक शेअर्सधारकांना याचा फटका बसला. त्यामुळे अनेकांनी कंपनीतील गुंतवणूकही काढून घेतली आहे. याप्रकरणी गौतम अदानी यांनी हिंडेनबर्गविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तर, संसदीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटले आहे. राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातही यावर चर्चा झाली. अदानी समूहाचे शेअर्स सातत्याने घसरत असल्याने धारावी झोपडपट्टी पूनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट गौतम अदानींकडून काढून घ्यावे, अशी मागणी धारावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

 

First Published on: March 24, 2023 9:46 AM
Exit mobile version