पुढील वीस वर्षे बसप अध्यक्षपदी मीच – मायावती

पुढील वीस वर्षे बसप अध्यक्षपदी मीच – मायावती

उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणूकीत अतिशय वाईट पद्धतीने पराभव पत्कारावा लागल्यानंतर मायावती आणि पक्षातील इतर नेतेमंडळी यांचे पक्षांतर्गत परस्परातील मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शिवाय, पक्षात अध्यक्ष पदावरुन विविध चर्चांना उधाण आले असल्याचे मायावती यांना जाणवू लागले. त्यामुळे मायावती यांनी शनिवारी लखनऊ येथे पक्षाची बैठक घेतली. या सभेमध्ये मायावती यांनी पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना खडेबोल सुनावले. तसेच पार्टीच्या अध्यक्षपदाचा कुणीही विचार करु नये. मी अजून पुढील २०- २२ वर्षे अध्यक्ष राहणार असल्याचे मायावती यांनी पक्षातील लोकांना ठणकावले.

पक्षात फेरबदल, सख्ख्या भावाचे उपाध्यक्षपदही काढून घेतले

मायावतींनी पक्षामध्ये थोड्याफार प्रमाणात फेरबदल केले आहे. या फेरबदलात मायावतींनी स्वत:चा सख्खा भाऊ आनंद कुमार यांचे उपाध्यक्षपदही काढून घेतले आहे. यावर बोलताना मायावती यांनी ***** संविधानाच्या नियमांनुसार पक्ष अध्यक्षाच्या नातेवाईकांना किंवा जवळील व्यक्तीला कुठलेही पद देता येऊ शकत नाही, असे सांगितले. त्याचबरोबर आर.एस. कुशवाहा यांना उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष बनविले आहे. तर, त्याआधी या पदावर असणाऱ्या राम अचल राजभर यांची नियुक्ती पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदी नियुक्ती केली आहे.

परिवारातील सदस्यांना कुठलेही पद नाही

मायावती सांगतात की, काही दिवसांपूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या आग्रहाखातर त्यांचे लहान भाऊ आनंद कुमार यांना पक्षाचे उपाध्यक्षपद दिले गेले होते. परंतु, मीडियामध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये बसप देखील काँग्रेसच्याच पाऊलावर पाऊल ठेवत घरच्यांना पदासाठी प्रथम प्राधान्य देत असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचबरोबर मायावती सांगतात की, त्यांच्या परिवारातील किंवा जवळच्या कुठल्याही सदस्याला निवडणूक लढवता येणार नाही किंवा विधानभवनाचा सदस्य बनता येणार नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचे मंत्रीपद देता येणार नाही. हा नियम फक्त पक्षाच्या अध्यक्षाला लागू असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा नियम लागू नसल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: May 28, 2018 12:28 PM
Exit mobile version