इम्रान खान यांच्या विमानाने उड्डाण घेताच तांत्रिक बिघाड, केले इमर्जन्सी लँडिंग

इम्रान खान यांच्या विमानाने उड्डाण घेताच तांत्रिक बिघाड, केले इमर्जन्सी लँडिंग

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे शनिवारी संभाव्य विमान दुर्घटनेतून बचावले. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने ते इस्लामाबाद विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले, असे वृत्त स्थानिक प्रसार माध्यमांनी दिले आहे. एका सभेसाठी इम्रान खान गुजरानवाला येथे जात होते. पण विमान खराब झाल्याने ते रस्तेमार्गे गुजरानवाला येथे गेले, असे येथील स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) या पक्षाचे नेते इम्रान खान यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर वैमानिकाने कंट्रोल टॉवरला कळविले आणि अवघ्या काही मिनिटांतच विमान विमानतळावर उतरविले, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. तथापि, विमानात तंत्रिक बिघाड झाल्याचे वृत्त फेटाळताना, खराब हवामानामुळे इम्रान खान यांचे विमान माघारी उतरविण्यात आल्याचे पीटीआयचे नेते अझर मशवानी यांनी म्हटले आहे. तसेच ट्वीटही त्यांनी केल्याचे डेली पाकिस्तानने म्हटले आहे.

पीटीआयशी संलग्न इंसाफ स्टुडंट फेडरेशनची (आयएसएफ) गुजरानवालाला सभा होती. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या सभेत इम्रान खान पाकिस्तान सरकारवर टीका केली. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त केले. पण देश आता दुसऱ्या गुलामगिरीच्या जोखडात अडकला आहे, असे इम्रान खान यांनी सभेत सांगितले. देशभरातील कामगार आणि नागरिकांनी समोर येऊन आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यमान सरकारच्या अंतर्गत देशाला आणि अर्थव्यवस्थेला वाचवायचे असेल तर, आस्थापनाविरुद्ध आवाज उठवा, असे आवाहन करतानाच पाकिस्तानात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला. ही मागणी मान्य न झाल्यास शांतीपूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल किंवा निवडणुका घेण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

इम्रान खान यांच्यावर खटला
एका महिला न्यायमूर्तींबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल न्यायालयाच्या अवमान केल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे. या अवमानना प्रकरणात इम्रान खान यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचे सांगत खटला चालण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

First Published on: September 11, 2022 3:32 PM
Exit mobile version