Ind v/s China : लडाख सीमावादावर सैन्य अधिकाऱ्यांची चर्चा; १३ तास सुरू होती बैठक

Ind v/s China : लडाख सीमावादावर सैन्य अधिकाऱ्यांची चर्चा; १३ तास सुरू होती बैठक

भारत विरुद्ध चीन

भारत आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये लडाख सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल, सोमवारी सहाव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक पार पडली. मोल्डोमध्ये ही बैठक तब्बल १३ तास सुरू होती. सकाळी सुरु झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. या बैठकीला उपस्थित असलेले भारतीय प्रतिनिधी लवकरच आपल्या वरिष्ठांना नेमकी काय चर्चा झाली, त्याची माहिती देतील. या बैठकीला १४ कॉर्प्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरींदर सिंह, लेफ्टनंट जनरल पी. जी. के. मेनन आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव उपस्थित होते.

दोन्ही बाजुच्या कॉर्प्स कमांडरमध्ये जवळपास महिन्याभरानंतर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांची एक बैठक पार पडली होती. त्यात मोल्डोच्या बैठकीसाठी भारताचे मुद्दे आणि अजेंडा निश्चित करण्यात आला. भारतीय सैन्याने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील महत्त्वाचे उंचावरील प्रदेश आपल्या ताब्यात घेतलेले असताना ही बैठक होत आहे. तसेच वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान मॉस्को येथे भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचीही बैठक झाली होती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S JAISHANKAR) आणि चिनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (WANG YI) यांच्यात झालेल्या बैठकी दरम्यान सीमेवरचा तणाव संपवण्यासाठी ५ कलमी करार झाला. तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरूच राहतील आणि सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात येईल, असे या चर्चेत ठरवण्यात आले.

हेही वाचा –

First Published on: September 22, 2020 12:43 PM
Exit mobile version