एवढंच होतं बाकी! लाच घेण्यात आशिया खंडात ‘भारत’ अव्वल

एवढंच होतं बाकी! लाच घेण्यात आशिया खंडात ‘भारत’ अव्वल

एकीकडे सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावले उचलत आहेत. तर दुसरीकडे लाच घेण्यात भारत देश हा आशिया खंडात अव्वल असल्याचे समोर आले आहे. हे आम्ही नाही म्हणत तर एका सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. ट्रान्सपरनसी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, आशिया खंडात सर्वाधिक लाच घेणारा भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. तर भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर कंबोडिया असून तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे. तर सर्वात कमी लाचखोरीमध्ये मालदीव आणि जपान या देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन्ही देशांमध्ये दोन टक्के लोकच लाच घेतात.

लाचखोरींचे प्रमाण ३९ टक्के

सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरींचे प्रमाण हे ३९ टक्के आहे. तर गेल्या १२ महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे ४७ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर ६३ टक्के लोक म्हणतात की, सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावले उचलत आहेत. तर भारतात ४६ टक्के लोक आपले काम करुन घेण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. तसेच निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे. तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणारे ३२ टक्के लोकांचे म्हणणं आहे की त्यांनी जर, असं केलं नाही तर त्याचं काम होतच नाही.

सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश नाही

आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा दर १० टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये १२ टक्के लोकचे भ्रष्टाचार करतात. मात्र, या सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.

असा झाला खुलासा

भारतात करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ४२ टक्के लोकांनी पोलिसांना लाच दिली आहे. सरकारी ओळखपत्र मिळवण्यासाठी ४१ टक्के लाच द्यावी लागली. तर ६३ टक्के लोकांना भ्रष्टाचाराची माहिती देण्यास भीती वाटत आहे.
दरम्यान, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ‘ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया’ या नावाने आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये १७ देशांतून २० हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. हा सर्व्हे जून आणि सप्टेंबर या महिन्यांदरम्यान करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहा प्रकारच्या सरकारी सेवांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक चार लोकांपैकी तीन जणांनी त्यांच्या देशात भ्रष्टाचार ही मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – देशात International Flight ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार


 

First Published on: November 26, 2020 5:10 PM
Exit mobile version