भारत – पाक फाळणीला ७२ वर्षे, एका निर्णयाने घडले जगातले सर्वात मोठे स्थलांतर

भारत – पाक फाळणीला ७२ वर्षे, एका निर्णयाने घडले जगातले सर्वात मोठे स्थलांतर

आज ३ जून म्हणजे बरोबर ७४ वर्षांपूर्वी भारताची फाळणी करून दोन तुकडे करण्याचा निर्णय झाला होता. या दिवशीच ३ जून १९४७ रोजी भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांनी भारताचे दोन तुकडे करत भारत आणि पाकिस्तान अशी दोन वेगवेगळी राष्ट्रे निर्माण करण्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा परिणाम इतका भयंकर होता की, अनेक नागरिकांना आपल्याच देशामध्ये शरणार्थी व्हावे लागले अशी अवस्था निर्माण झाली. या फाळणीमुळे जवळपास सव्वा कोटी लोक हे भारतापासून वेगळे झाले. जागतिक पातळीवरच्या इतिहासात ही घटना म्हणजे सर्वात मोठी स्थलांतराची घटना होती. या फाळणीच्या निर्णयानंतर भडकलेल्या दंगलीमुळे अनेक लोकांना आपले प्राणही गमवावे लागले. फाळणीचा परिणाम म्हणजे दंगल घडल्याने लाखो लोक मृत्यूमुखी पडले होते.

भारताच्या इतिहासात १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वातंत्रदिन म्हणून नोंद झाला खरा. पण त्यासोबतच फाळणीच्या कटू आठवणीही या स्वातंत्र्याच्या निमित्ताने अनेकांच्या मनात घर करून गेल्या. भारताला स्वतंत्र झाल्याची घोषणा होण्याआधीच म्हणजे १४ ऑगस्ट १९४७ रोजी रोजी पाकिस्तानची वेगळा देश म्हणून घोषणा झाली. या घोषणेनंतरच पाकिस्तान वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला. दुसरे जागतिक महायुद्ध संपल्यानंतर जगभरात स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली होती. पण त्याचवेळी धर्मांध शक्तींनीही आपली ताकद दाखवायला सुरूवात केली होती. अनेक ठिकाणी भडकणाऱ्या धार्मिक दंगलींमुळे अनेक ठिकाणी परिस्थिती विस्कळीत असल्यासारखा माहोल होता. मात्र १९४७ रोजी ब्रिटीश सरकारने भारताला स्वातंत्र्य देत असल्याची घोषणा केली. भारताला स्वातंत्र्य देण्याची जबाबदारी ही भारतातील तत्कालीन व्हाईसरॉय असलेले लॉर्ड माउंटबेटन यांच्याकडे सोपावण्यात आली होती.

माउंटबेटन यांनी कॉंग्रेस आणि मुस्लिम लीगच्या नेत्यांसमोर दीर्घ चर्चा करून ३ जून १९४७ रोजी भारतातल्या फाळणीची योजना सादर केली होती. भारतातील राजकीय समस्येवर तोडगा काढण्यासाठी माउंटबेटन यांनी फाळणीचाच शेवटचा पर्याय त्यावेळी दिला होता. योजनेनुसार भारतातील दोन वेगवेगळ्या भागांची फाळणी करत दोन देशांची निर्मिती केली जाणे अपेक्षित होते. त्यामध्ये एक देश भारत आणि दुसरा देश पाकिस्तान होणार होता. दोन्ही देशांमध्ये संविधान आणि संसदही वेगवेगळी असेल. भारतातल्या घराण्यांना त्यावेळी सवलत देण्यात आली होती की ते भारतात रहावे किंवा पाकिस्तानचा हिस्सा व्हावेत. दोन्ही देशांमध्येही रहायचे नसेल तर ते स्वतंत्र राहण्याचाही पर्याय देण्यात आला होता. त्यानंतर १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेने ही योजना मंजुर केली. माउंटबेटन यांच्या योजनेमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण काश्मीरसारख्या जटील प्रश्नाने डोके वर काढले. आजही दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरील वाद संपुष्टात आलेला नाही.

ऑपरेशन ब्लू स्टार

भारतीय सेनेने आजच्याच दिवशी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुरू केले होते. पंजाबच्या अमृतसर येथे सुवर्ण मंदिर परिसराचा खलिस्तानी समर्थक जनरल सिंह भिंडरावाले आणि त्यांच्या समर्थकांनी ताबा मिळवला होता. खलिस्तानींच्या तावडीतून हा परिसर मुक्त करण्यासाठी भारतीय सैन्याकडून ऑपरेशन ब्लू स्टारची सुरूवात केली होती. जवळपास ३ दिवस हे ऑपरेशन सुरू राहिले. त्यामध्ये ५०० हून अधिक लोकांचा बळी गेला. त्यामध्ये भारतीय सैन्याचे जवान आणि अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

का घडले ऑपरेशन ब्लू स्टार

भारतात फाळणीनंतर सर्वाधिक असा फटका शिखांना बसला होता. कारण अर्धा पंजाब हा पाकिस्तानाचा भाग झाला होता. शिखांचे पवित्र शहर असलेले लाहोर शहरही पाकिस्तानचा हिस्सा झाले होते. त्यामुळेच शिखांमार्फत वेगळ्या देशाची मागणी जोर धरू लागली होती. १९६६ रोजी भाषेच्या आधारावर हरियाणाला पंजाबपासून वेगळे करण्यात आले. तसेच चंदीगढलाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. १९८० च्या दशकात खलिस्तानच्या जोरावर स्वायत्त राज्याची मागणी वाढू लागली. त्यामध्ये खलिस्तान आंदोलन म्हणून नाव दिले गेले. त्यामुळेच जनरल सिंह भिंडरावाला यांचीही लोकप्रियता वाढू लागली. पण हे आंदोलन हळू हळू हिंसक होत गेले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठीच केंद्राने पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. पुढे १९८३ मध्ये पंजाबच्या डीआयजी अटवाल यांची सुवर्ण मंदिर परिसरात हत्या करण्यात आली. त्याचवेळी भिंडरावालाने सुवर्ण मंदिर परिसराला आपले ठिकाणी बनवले. त्याठिकाणी हत्यारे गोळा करण्याची सुरूवात झाली. सुवर्ण मंदिराला एका किल्ल्याचे रूप मिळण्याची सुरूवात झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या निशाण्यावर भिंडरावाला होता. त्याचाच भाग म्हणून केंद्राने ऑपरेशन ब्लू स्टारची रणनिती आखली.

सैन्याच्या अंदाजापेक्षाही खलिस्तानींची मोठी तयारी

ऑपरेशन ब्लू स्टारची जबाबदारी ही कमांडर मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांच्याकडे सोपावण्यात आली होती. ३ जून रोजी सरकारने सेनेच्या कमांडोला सुवर्ण मंदिर परिसरात पाठवले. खलिस्तानींची तयारी ही सरकारने बांधलेल्या अंदाजापेक्षा जास्तच होती. त्यामुळेच ऑपरेशनमध्ये टॅंकचा वापर करावा लागला. मोठ्या प्रमाणात झालेल्या गोळीबारात शेवटी भिंडरावालाचा मृत्यू झाला. त्यानंतर ७ जून पासून या परिसरात भारतीय सेनेने ताबा मिळवला. या ऑपरेशनमुळे शीख समुदायात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात राग निर्माण झाला. त्याचा परिणाम अवघ्या ४ महिन्यातच दिसून आला. याचाच बदला म्हणून ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच दोन सुरूक्षा रक्षकांकडून हत्या करण्यात आली.


 

First Published on: June 3, 2021 4:02 PM
Exit mobile version