सर्व्हे: भारतीय महिला ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’मध्ये असुरक्षित!

सर्व्हे: भारतीय महिला ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’मध्ये असुरक्षित!

प्रातिनिधिक फोटो

देशातील महिला सुरक्षित राहाव्यात म्हणून नेहमीच नवनवीन उपाययोजना राबवल्या जातात. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजवर अनेक सोयी-सुविधा देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरीही देशातील अनेक महिला आजही स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. बहुतांशी भारतीय महिला पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून प्रवास करतेवेळी स्वत:ला असुरक्षित समजत असल्याचा, खुलासा या सर्व्हेद्वारे झाला आहे. आजच्या तारखेला बस, लोकल, मेट्रो सारख्या पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना असणं ही बाब खरंच गंभीर आहे.

असुरक्षित महिलांची आकडेवारी

‘विंग्स २०१८: वर्ल्ड ऑफ इंडियाज गर्ल्स’ यांनी केलेल्या अभ्यापूर्ण सर्वेक्षणानुसार, ही माहिती मांडण्यात आली आहे. सर्व्हेमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार भारतात मुख्यत: ११ ते १८ वर्ष वयोगटातील मुली पब्लिक ट्रान्सपोर्टमधून वाहतूक करतेवेळी स्वत:ला असुरक्षित समजतात. या अभ्यासातील आकडेवारीनुसार आपल्या देशात ४७ टक्के शहरी भागातील महिला तर ४० टक्के ग्रामीण भागातील महिला पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. हे सर्वेक्षण आसाम, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या ६ प्रमुख राज्यांमध्ये करण्यात आलं होतं. यासाठी ६ राज्यांमधील मिळून एकूण ३० शहरं, ८४ गावं आणि १२ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता.

का घाबरतात महिला ?

पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा किंना राखीव डब्यांची सोय करण्यात आलेली असते. मात्र, असे असले तरीही गर्दीच्यावेळी बरेचदा स्त्री-पुरुषांना एकत्रच प्रवास करावा लागतो. अशावेळी बरेचदा पुरुष सहप्रवाशांकडून होणाऱ्या गैरव्यवहारांमुळे किंवा असभ्य वर्तनामुळे बहुतांशी महिलांना असुरक्षित वाटत असल्याचं, सर्वेक्षणातून समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यतिरिक्त महिलांना थिएटर, मार्केट यासारख्या सार्वजनिक ठिकाणांवरही असुरक्षित वाटतं. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार शहरातील २० टक्के महिला सार्वजनिक जागांवर होणाऱ्या हल्ल्यांना घाबरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ११ टक्के शहरी महिलांना बलात्काराची भीती सतवत असल्याचं समोर आलं आहे.

देशभरात महिलांच्या सुरक्षिततेतचा प्रश्न ऐरणीवर असताना, अशाप्रकारचं सर्व्हेक्षण समोर येणं ही नक्कीच कुठेतरी विचार करायला लावणारी आणि गंभीर बाब आहे.

 

 

First Published on: July 4, 2018 5:27 PM
Exit mobile version