कौतुकास्पद! जेव्हा अमेरिकेत गणेशोत्सव साजरा होतो; पाहा व्हिडिओ

कौतुकास्पद! जेव्हा अमेरिकेत गणेशोत्सव साजरा होतो; पाहा व्हिडिओ

गणपती बाप्पाशी प्रत्येक भक्ताचं अवीट असं नातं असतं. त्यामुळे प्रत्येक गणेशोत्सवात लाखो घरांमध्ये, मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होतो‌. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला फार महत्त्व आहे. शिवाय गणेशोत्सव फक्त सण नसून संस्कृती आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. याच कर्तव्यच्या जाणिवेतून सातासमुद्रापार वास्तव्यास गेलेल्या मराठमोळ्या हटकर दांम्पत्याने ही संस्कृती जपण्याचा निश्चय केला आहे. सातासमुद्रापार जाऊन आपल्या संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणं ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि ते साकारत आहेत नॉर्थ कॅरोलिनाला वास्तव्यास असलेले मुळचे बदलापूरचे रहिवाशी सोहम हटकर आणि त्यांच्या पत्नी.

सोहम हे पेशाने इंजिनिअर आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून नोकरी निमित्ताने अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी गृहिणी आहे. सोहम हटकर यांचे वडील देवीदास (बापूसाहेब) हटकर हे एक नामांकित अहिराणी साहित्यिक आहेत. आपली भाषा आणि संस्कृतीवर निस्सम प्रेम करावे, अशी बापूसाहेब हटकर यांची शिकवण. याच विचारांना आत्मसात करून त्यांनी अमेरिकेत गणेशोत्सव साजरी करण्याचे ठरवले.

‘आई-बाबांची अत्यंत आठवण येते. मुलाला गणपती बाप्पा समजायला हवा. आपल्या मनात असलेली बाप्पा बद्दलचा आदर आणि गोडी त्याच्यातही झिरपायला हवी. याशिवाय गणेशोत्सव नेमकं असतो तरी काय? हे दाखवण्यासाठी यावर्षी गणेशोत्सव साजरी करायचं ठरवलं’, हे बोल अमेरिकेत वास्तव्यास असलेले मुळचे बदलापूरचे रहिवासी सोहम हटकर यांचे आहेत. या कार्यात त्यांना त्यांच्या सोसायटीतील स्थानिक नागरिकांचीही चांगली साथ मिळाली. त्यामुळे ‘आपली माती, आपली माणसं’ असं आपण उगाच म्हणत नाहीत. अमेरिकेत सोहम हटकर यांच्या सोसायटीत १०६ जणांपैकी १०० रहिवासी हे भारतीय आहेत आणि सर्वांनी गुण्यागोविंदानं सोहम यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांची भक्तीभावाने आस्था‌ केली. सातासमुद्रापार वाजत-गाजत घरगुती गणेशोत्सव साजरी करणाऱ्या सोहम हटकरांचे मोठे कौतुक होत आहे. ‘आपल्या मातीशी घट्ट नाळ बाळगून विदेशात संस्कृतीच्या संवर्धनाचा प्रयत्न करणे, हे मोठे कर्तृत्व आहे’, अशा शब्दांमध्ये त्यांच्या कार्याला अमेरिकेतील भारतीय नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

First Published on: September 10, 2019 11:39 AM
Exit mobile version