व्हाट्सअॅपमार्फत भारतीयांची माहिती होतेय हॅक

व्हाट्सअॅपमार्फत भारतीयांची माहिती होतेय हॅक

देशातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे व्हाट्सअॅप हॅक?

व्हाट्सअॅप आणि फेसबुक हे रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक बनले असले तरीही या माध्यमांवर कितपत विश्वास ठेवून यांचा वापर करावा? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. देशातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे व्हाट्सअॅप अकाउंट हॅक करुन हेरगिरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका इस्त्रायली स्पायवेअरच्या मार्फत जगभरातील अनेक युजर्सची हेरगिरी करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय माहिती आणि दूरसंचार मंत्रालयाने व्हाट्सअॅपकडे स्पष्टीकरण मागितले आहे. केंद्र सरकारने यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

याअगोदरही फेसबुक युजर्सचा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आली होती. तेव्हा फेसबुकने माफी देखील मागितली होती. आता पुन्हा एकदा तसाच एक प्रकार समोर आला आहे. मात्र, हा प्रकार फक्त हॅक करण्यापर्यंत मर्यादित न राहता त्या पलीकडे म्हणजे पाळत ठेवण्यापर्यंत गेला आहेत. देशातील व्हीआयपी लोकांचे व्हाट्सअॅप हॅक करुन पाळत ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कुणाकुणाच्या व्हाट्सअॅप अकाउंटवर पाळत ठेवले गेले, त्यांची नावे अजून समोर आलेली नाहीत.

व्हाट्सअॅपने यासंदर्भात खुलासा केला आहे. इस्त्रायली स्पायवेअर पेगाससच्या मार्फत हॅकर्सने जगभरातील सुमारे १४०० लोकांचे व्हाट्सअॅप अकाउंट हॅक केले आहेत. यामध्ये राजकीय व्यक्ती, पत्रकार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

First Published on: October 31, 2019 6:24 PM
Exit mobile version