ISRO नं केलं PSLV-C49 चं श्रीहरीकोटाहून प्रक्षेपण!

ISRO नं केलं PSLV-C49 चं श्रीहरीकोटाहून प्रक्षेपण!

ISRO अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं आज चांद्रयान-२ मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं अपयश झटकून टाकत PSLV-C49 या उपग्रह वाहक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यामध्ये एकूण १० उपग्रह असून त्यातले ९ परदेशी आहेत तर EOS-01 हा भारतीय उपग्रह आहे. या उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीच्या सॅटेलाईट इमेज काढण्यात मोठी मदत होणार असून खराब हवामानामध्ये देखील उत्तम दर्जाचे फोटो काढता येणार आहेत. त्यामुळे इस्त्रोसाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे. श्रीहरीकोटा येथील केंद्रावरून पीएसएलव्हीचं लाँचिंग करण्यात आलं आहे. कोरोना काळात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर इस्त्रोची ही पहिली यशस्वी कामगिरी ठरली आहे.

लाँच करण्यात आलेल्या १० उपग्रहांपैकी EOS-01 हा भारतीय उपग्रह अत्याधुनिक प्रणालीने सज्ज आहे. या उपग्रहासाठी अत्यंत शक्तीशाली असं रडार वापरण्यात आलं आहे. त्यामुळेच खराब हवामानामध्ये देखील या उपग्रहाचं काम थांबणार नाहीये. त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन, भूगर्भ शास्त्र अशा क्षेत्रांसोबतच भारतीय लष्कराला देखील याची मोठी मदत मिळू शकणार आहे. अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाईटचं प्रगत रुप म्हणून अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट ओळखलं जातं. इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करून अभिनंदन केलं आहे.

First Published on: November 7, 2020 5:20 PM
Exit mobile version