काश्मीरमधील चकमकीत पाकचे २ सैनिक ठार; १ जवान शहीद

काश्मीरमधील चकमकीत पाकचे २ सैनिक ठार; १ जवान शहीद

जवानाला वीरमरण

जम्मू-काश्मीरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे. पाकच्या गोळीबाराला उत्तर देताना भारताने केलेल्या कारवाईत दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. या गोळीबारात एक भारतीय जवानही शहीद झाला आहे. क्रिश्नन लाल असे शहीद झालेल्या ३४ वर्षीय नाईक जवानाचे नाव आहे. मुळचे घाग्रीया गावाचे रहिवासी असलेल्या क्रिश्नन लाल यांना जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या सीमेवर झालेल्या चकमकीत वीरमरण आले. जम्मू-काश्मीरच्या तंगधार आणि केरन सेक्टरमध्ये ही चकमक उडाली.

गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत मोर्टारचा मारा केला. तसेच आजही दुपारनंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांत गोळीबार सुरू केला आहे. तंगधार आणि केरन सेक्टरमध्येही पाकिस्तानने गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात पाकिस्तानचे दोन जवान ठार झाले. तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानने कारण नसताना गोळीबार सुरू ठेवला आहे. गोळीबार करतानाच पाकिस्तानने मोर्टारचाही मारा केलाय. रविवारीही पाकिस्तानने पुंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला होता. पाकच्या या गोळीबारात दहा वर्षाचा एक मुलगा जखमी झाला होता. येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना या मुलाचा सोमवारी मृत्यू झाला.

हेही वाचा –

गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लावली – जितेंद्र आव्हाड

आता धनगर समाजाला मिळणार आदिवासींच्या सवलती

First Published on: July 30, 2019 5:42 PM
Exit mobile version