कंझावाल अपघात प्रकरण : अपघाताच्या वेळी अंजली होती दारूच्या नशेत…

कंझावाल अपघात प्रकरण : अपघाताच्या वेळी अंजली होती दारूच्या नशेत…

नवीन वर्षाच्या मध्यरात्री दिल्लीतील कंझावाल भागात घडलेल्या अपघातात अंजली नावाच्या एका मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दिल्ली पोलीस मुख्यालयातील सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. त्या माहितीनुसार ज्यावेळी अंजलीचा अपघात झाला, तेव्हा ती दारूच्या नशेत होती, अशी माहिती देण्यात आली आहे. अंजलीच्या मृत्यूनंतर तिचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले होते. पण या पोस्टमॉर्टेमच्या व्हिसेराची तपासणी करणे बाकी होते. या व्हिसेराची रोहिणी येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर पोलिसांच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांकडून कायमच वेगवेगळी माहिती देण्यात येत होती. परंतु या घटनेनबाबत अधिक तपासणी केल्यानंतर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अंजलीची मैत्रीण निधी हिची चौकशी केली. त्यावेळी निधीनेदेखील अंजली दारूच्या नशेत असल्याची माहिती दिली होती. तर अंजलीच्या आईने निधी आरोपी असल्याचे म्हटले होते. परंतु अखेरीस व्हिसेरा रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार अंजली ही घटनेच्यावेळी दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

काय आहे संपूर्ण घटना ?

दिल्लीच्या कंझावला भागात नवीन वर्षाच्या म्हणजेच 1 जानेवारी 2023 च्या पहाटेला या ठिकाणाहून रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना एक चारचाकी वाहनाने मुलीला ओढत नेले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची अधिक चौकशी केली असता, पोलिसांनी याप्रकरणी पाच लोकांना अटक केली. यामध्ये देखील पोलिसांनी अनेकदा आपली माहिती बदलली. ज्यामुळे नागरिकांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या दिवशी अंजलीच्या सोबत असलेल्या तिच्या निधी नावाच्या मैत्रिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्यानुसार, निधी आणि अंजली हे एकाच स्कुटीवर दिसून आले होते. पण निधीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये या दोघींनी मद्यपान केल्याची माहिती दिली होती. तसेच निधीला तिच्या शेजारच्यांनी देखील त्या रात्री घाबरून घरी आलेले पाहिले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात निधीच मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.

First Published on: February 3, 2023 3:30 PM
Exit mobile version