“ईडीला भाजप नेत्यांच्या घरचा रस्ता माहीत नाही…” कपिल सिब्बल यांची टीका

“ईडीला भाजप नेत्यांच्या घरचा रस्ता माहीत नाही…” कपिल सिब्बल यांची टीका

लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबानंतर आता २०१७ मध्ये सत्ता गमावलेले आरजेडीचे युवराज आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे आता ईडीच्या कचाट्यात अडकणार असं चित्र दिसतंय. कारण नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याचा आरोप असलेल्या कंपनीच्या नावावर दिल्लीतील त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही आता ईडी सक्रीय झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर आता विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत. अशात काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीकडून होणाऱ्या कारवायांवर बोलताना कपिल सिब्बल यांनी थेट ईडी आणि सीबीआयवरही निशाणा साधलाय. “जेव्हा सर्वच राजकीय पक्ष अन्यायाविरुद्ध एकत्रितपणे लढतील तेव्हाच माझा प्लॅटफॉर्म यशस्वी होईल. बंगालमध्ये ममता, महाराष्ट्रात उद्धव, केरळमध्ये सीपीएम, बिहारमध्ये तेजस्वी, युपीमध्ये अखिलेश, झारखंडमध्ये हेमंत सोरेन आणि काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला यांच्याविरुद्ध केंद्र सरकारकडून अन्याय होत आहे. त्यामुळे, न्याय मिळवण्यासाठीच्या मुद्दयाने हे सर्वचजण एकत्र आले तर, आम्हाला यश मिळेल”, असे काँग्रेस नेते आणि ठाकरे गटाचे सर्वोच्च न्यायालयातील वकिल कपिल सिब्बल यांनी म्हटलंय.

तुम्ही गेली १० वर्षे मंत्री आहात, ED-CBI सरकारच्या बाजूने कारवाई करत आहे का? तुमच्या काळातही अशा कारवाया झाल्या होत्या? असा सवाल यावेळी पत्रकारांनी कपिल सिब्बल यांना केला होता. यावर उत्तर देताना कपिल सिब्बल म्हणाले की, भारताचा नकाशा पाहिला तर ईडीने त्या नकाशाचे विभाजन केले आहे. जिथे भाजपची सरकार आहेत, तिथे त्यांचा ईडीचा रस्ता जात नाही. जिथे विरोधी पक्षाचे नेते बसले आहेत तिथे ते प्रत्येक गल्लीबोळात पोहोचतात. हे सर्व भाजपच्या इशाऱ्यावर होत आहे. भाजपला वाटतं की निवडणुका येत आहेत, सिसोदियाला आत टाका, शिबू सोरेन विरुद्ध लोकपाल नोटीस द्या, लालूजींना प्रश्न विचारायला सुरुवात करा. केंद्रीय संस्था राजकीय झाल्या आहेत.” , असा घणाघात यावेळी कपिल सिब्बल यांनी केला.

First Published on: March 11, 2023 5:50 PM
Exit mobile version