Karnataka Elections : भाजपने उतरवले 52 नवे उमेदवार, दिग्गजांना धक्का; 189 जणांची पहिली यादी जाहीर

Karnataka Elections : भाजपने उतरवले 52 नवे उमेदवार, दिग्गजांना धक्का; 189 जणांची पहिली यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाने (BJP) मंगळवारी रात्री कर्नाटक विधानसभेसाठीची १८९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात ५२ नवे उमेदवार आहेत. तर १८९ मध्ये फक्त ८ महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पहिल्या यादीत नाव प्रसिद्ध झाले आहे. तर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचे नाव पहिल्या यादीत आलेले नाही. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. यादी प्रसिद्ध होताच शेट्टार दिल्लीत पोहोचले आहेत. ते आज पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री बोम्मई शिगगांव येथून निवडणूक लढणार आहेत. माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचा मुलगा बी.वाय विजयेंद्र वडिलांच्या शिकारीपूरा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. पहिली यादी ही १८९ उमेदावारांची आहे. उर्वरीत ३४ नावांची दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होईल असे, बोम्मई म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवि पारंपरिक चिकमंगलूर मतदारसंघातून लढणार आहेत. मंत्री आर अशोक यांना दोन मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले आहे. ते कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी.के. शिवकुमार यांच्याविरोधात कनकपूर आणि पद्मनाभनगर मतदारसंघातून लढणार काँग्रेसला आव्हान देणार आहे.

भाजपने जागा वाटपात सर्व समाजाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसींना ३२, अनुसूचित जातींना ३०, अनुसूचित जमातींना १६ जागा दिल्या आहेत. तर पाच वकिलांनाही तिकीट दिले आहे. केंद्रीय मंत्री आणि कर्नाटक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथील पक्ष मुख्यालयात ही यादी प्रसिद्ध केली आहे.

शेट्टार बंडखोरीच्या तयारीत
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार बंडखोरीच्या तयारीत आहेत. मी निवडणूक लढणार नाही, असं त्यांनी स्वतः जाहीर करावं असं पक्षाने त्यांना सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही शेट्टार हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. शेट्टार संबंधीच्या प्रश्नावर प्रधान म्हणाले, पक्ष त्यांचे समाधान करेल. दरम्यान शेट्टार हे दिल्लीत पोहोचले आहेत. ते आज जेपी नड्डा यांची भेट घेण्याची शक्यत आहे.

First Published on: April 12, 2023 10:36 AM
Exit mobile version