अंत्यसंस्कारांनंतर मेलेला माणूस पुन्हा परतला! हो, हे खरं आहे!

अंत्यसंस्कारांनंतर मेलेला माणूस पुन्हा परतला! हो, हे खरं आहे!

प्रातिनिधिक छायाचित्र

बातमीचं शीर्षक वाचून तुम्हाला हा काय प्रकार आहे? असा प्रश्न पडला असेल. काहींना हा चमत्कार वाटला असेल किंवा काहींना हा अंधश्रद्धेचा प्रकार वाटला असेल. पण हा अंधश्रद्धेचा प्रकार नसून खरोखरच केरळमध्ये अंत्यसंस्कार झालेली एक व्यक्ती १५ दिवसांनंतर चक्क आपल्या घरी परतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या (मृत पण जिवंत!) अशा व्यक्तीच्या घरच्यांना मोठा धक्का तर बसलाच, पण त्यांच्या आनंदालाही पारावार राहिला नाही. विशेष म्हणजे ही व्यक्ती मृत्यूपूर्वी सुमारे २ महिने बेपत्ता होती. याच अंत्यसंस्कारांनंतर परत आलेल्या व्यक्तीचं नाव आहे साजी आणि ही घटना घडली आहे केरळमधल्या वायनाड जिल्ह्यात! द न्यूज मिनटनं या सगळ्या प्रकारासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मागच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमघ्ये १६ तारखेला वायनाडच्या अडिकोळ्ळी गावात ४८ वर्षीय साजी यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह ख्रिश्चन पद्धतीने पुरला. सेंट सेबॅस्टियन चर्च परिसरात त्यांनी अंत्यसंस्कार केले. पण बरोबर १५ दिवसांनी, म्हणजेच ३१ ऑक्टोबरला अचानक साजी त्यांच्या घरी परतले! त्यामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला. नक्की काय घडलं ते घरच्यांना काही कळेचना!

३ सप्टेंबर रोजी साजी यांचं शेजारच्यांशी भांडण झालं होतं. तेव्हापासूनच ते बेपत्ता झाले असल्याचं सांगितलं जात होतं. पण त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या बेपत्ता असल्याची कोणतीही पोलीस तक्रार नोंदवली नव्हती. १३ ऑक्टोबरला बीचनहळ्ळी पोलिस स्टेशनमधून साजी यांच्या कुटुंबियांना अनोळखी मृतदेह सापडल्याचा फोन आला. त्यानंतर साजी यांची आई फिलोमेना मृतदेह ठेवलेल्या मनंथवडी रुग्णालयात पोहोचली. मृतदेहाच्या पायावरची जखमेची खूण आणि पायातल्या चपलांवरून हा मृतदेह साजी यांचाच असल्याची त्यांच्या आईची खात्री पटली.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर इतर सोपस्कार पार पाडून साजी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. आणि १६ ऑक्टोबर रोजी सेंट सेबॅस्टियन चर्चच्या आवारात ख्रिश्चन पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे साजी यांच्या कुटुंबियांना त्यांचा रीतसर मृत्यूचा दाखला देखील मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं. साजी यांचं कुटुंब शोकमग्न झालं…

कुटुंबियांना वाटलं भूतच आलंय!

अचानक ३१ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजता साक्षात साजीच त्यांच्या अदिकोळ्ळी इथल्या घरी हजर झाले आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला! सुरुवातीला साजीच आहेत की त्यांचं भूत आहे, या भितीमध्ये त्यांचं कुटुंब होतं. नंतर भीत भीतच त्यांनी साजी यांना घरात घेतलं आणि त्यांची विचारपूस सुरू केली. पण खरा प्रकार काही समजत नव्हता. शेवटी हे सगळं कुटुंबं थेट पुलपळ्ळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं. पोलिसांनी साजी यांच्याकडे रीतसर चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला.

साजींकडे मोबाईल असता तर…

३ ऑक्टोबरला शेजाऱ्यांशी भांडण झाल्यानंतर साजी घरातून निघून गेले होते. त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे घरच्यांना त्यांचा पत्ताच लागला नाही. त्यांनाही घरच्यांशी संपर्क ठेवता आला नाही. दरम्यानच्या काळाच साजी यांनी कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी मजुरीची कामं केली आणि अखेर ३१ ऑक्टोबरला ते पुलपळ्ळीमध्ये त्यांच्या घरी पोहोचले. त्यामुळे कुटुंबियांनी साजी समजून जो मृतदेह ताब्यात घेतला होता आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते तो मुळी साजी यांचा नव्हताच हे स्पष्ट झालं.

मृतदेह ओळखण्यामध्ये झालेल्या गोंधळामुळे साजी यांचं कुटुंब तब्बल १५ दिवस दु:खात होतं. ते जिवंत असतानाच त्यांच्या नावाने अंत्यसंस्कारही झाले होते. आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या कामालाही लागले होते. पण साजी परत आल्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला आहे. पण या प्रकारामुळे साजी आणि त्यांचा कधीही न झालेला मृत्यू हा त्यांच्या संपूर्ण पुलपळ्ळी जिल्ह्यात आणि बाजूच्या कर्नाटकमधल्या बीचनहळ्ळी जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता!


हेही वाचा – जगातली सर्वात बुटकी गाय खेडमध्ये; उंची २ फूट ३ इंच!

First Published on: November 3, 2018 5:58 PM
Exit mobile version