६ जणांच्या हत्येनंतर ती म्हणाली, ‘आता फक्त स्वत:च्याच मृत्यूचं आकर्षण’!

६ जणांच्या हत्येनंतर ती म्हणाली, ‘आता फक्त स्वत:च्याच मृत्यूचं आकर्षण’!

काही दिवसांपूर्वी केरळमधील एका हत्याकांडाच्या बातमीने संपूर्ण केरळमध्ये खळबळ माजली होती. एका महिलेने तिच्याच घरच्या ६ जणांची हत्या केली होती. २००२ ते २०१६ या १४ वर्षांमध्ये तिने या हत्या केल्या होत्या. शेवटच्या हत्येनंतर संशयावरून पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तिच्या चौकशीतून पोलिसांना तिने या हत्या का केल्या याचं कारण पोलिसांना समजलं आणि पोलीस देखील नि:शब्द झाले. मृत्यूचं आकर्षण असल्यामुळेच या महिलेने या सगळ्या हत्या केल्याचं तिच्या चौकशीतून निष्पन्न झालं आहे. जॉली थॉमस असं या ४७ वर्षीय महिलेचं नाव असून तिने तिचा पती, सासू, सासरे, सासूचा भाऊ, त्याची पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा अशा सहा जणांची हत्या केली आहे. दरम्यान, जॉली सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे.

‘…आता फक्त स्वत:च्याच मृत्यूचं आकर्षण’

‘मला मृत्यूचं आकर्षण होतं. मृत्यूबद्दल अजून जाणून घ्यायची मला इच्छा होती. तशाच बातम्या मी वाचत होते. मात्र, यानंतर अजून कुणाची हत्या करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. आता फक्त स्वत:च्याच मृत्यूची इच्छा आहे’, असं या महिलेने तिच्या चौकशीमध्ये सांगितलं आहे. तिच्या या कबुलीजबाबामुळे पुन्हा एकदा या हत्या प्रकरणावरून खळबळ उडाली आहे. जॉलीच्या बॅगेत कायम सायनाईड हे विषारी द्रव्य असायचं असं तपासात उघड झालं आहे. याच सायनाईडचा वापर करून जॉलीने घरातल्या ६ जणांचा जीव घेतला.

२ वर्षांच्या चिमुरडीलाही नाही सोडलं!

सर्वात आधी २००२मध्ये जॉलीच्या सासू अन्नम्मा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर २००८मध्ये जॉलीचे सासरे टॉम थॉमस यांचा मृत्यू झाला. २०११मध्ये जॉलीचा नवरा रॉय थॉमस देखील मरण पावला. २०१४मध्ये रॉय थॉमसचा मामा मॅथ्यू यांचंही निधन झालं. तर त्यांचा मुलगा शाजूची २ वर्षांची मुलगी २०१५मध्ये तर शाजूची पत्नी सिली २०१६मध्ये मरण पावली. या सर्व मृत्यूंच्या वेळी संशयास्पद घडामोडी घडत होत्या. मात्र, कुणालाही जॉलीवर संशय आला नाही. कुणीही पोलीस तक्रार न केल्यामुळे या कुणाचंही पोस्टमार्टेम झालं नाही. शिवाय जॉलीचं वर्तन एका चांगल्या गृहिणीसारखं असल्यामुळे कुणालाही तिच्यावर संशय येणं शक्यच नव्हतं. पण अखेर टॉम थॉमस यांच्या भावाने पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हा सगळा प्रकार समोर आला.

First Published on: October 14, 2019 6:00 PM
Exit mobile version