पाकिस्तानच्या तुरुंगात 28 वर्षे बंद होता कुलदीप, भारतात परतल्यावर सरकारकडे मागितली मदत

पाकिस्तानच्या तुरुंगात 28 वर्षे बंद होता कुलदीप, भारतात परतल्यावर सरकारकडे मागितली मदत

1994 मध्ये पाकिस्तानी एजन्सींनी अटक केलेल्या भारतीय व्यक्तीला संशयाच्या आरोपाखाली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जवळपास 28 वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात असलेला भारतीय व्यक्ती आपल्या मायदेशी परतला आहे. 59 वर्षीय कुलदीप यादव यांची गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली होती.

कुलदीपला पाकिस्तानातून अटक

अहमदाबादच्या साबरमती आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर आणि एलएलबी कोर्स केल्यानंतर कुलदीप 1991 मध्ये नोकरीच्या शोधात होता. तेव्हा काही लोकांनी देशासाठी काम करण्याची ऑफर घेऊन त्याच्याकडे संपर्क साधला. कुलदीपने सांगितले की, 1992 मध्ये त्याला पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. जवळपास दोन वर्षांनी त्यांनी जून 1994 मध्ये परतण्याची योजना आखली. मात्र मायदेशी परतण्यापूर्वी कुलदीपला पाकिस्तानी एजन्सीने अटक करून न्यायालयात हजर केले. जवळपास दोन वर्ष विविध एजन्सींनी चौकशी केली होती.

1996 मध्ये पाकिस्तानच्या न्यायालयाने त्याला संशयाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर कुलदीपची रवानगी लाहोरच्या सिव्हिल सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. यावेळी त्याला स्वर्गीय सरबजीतला भेटण्याची संधी मिळाली. तुरुंग अधिकारी दर पंधरवड्याला आमची भेट घडवून आणत. सरबजीतच्या मृत्यूपर्यंत पाकिस्तानी आणि भारतीय कैदी एकाच बॅरेकमध्ये राहत होते, असं कुलदीप म्हणाला.

कुलदीपची सरकारकडे मागणी

30 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर आज मी फक्त माझा लहान भाऊ दिलीप आणि बहीण रेखा यांच्यावर अवलंबून आहे. सेवानिवृत्त सैनिकांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी. जर मला शेतजमीन, पेन्शन आणि घरासाठी जमीन दिली तर माझे आयुष्य पुन्हा उभे राहू शकेल, असं कुलदीप म्हणाला.


हेही वाचा : झारखंडपाठोपाठ आता मध्य प्रदेशातही एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला ; तरुणीची प्रकृती चिंताजनक


 

First Published on: August 31, 2022 3:25 PM
Exit mobile version