Lakhimpur Kheri Violence: अजय मिश्रांचे केंद्रीय मंत्रिपद धोक्यात; राजीनाम्यासाठी राज्यातील भाजप नेते दिल्लीत

Lakhimpur Kheri Violence: अजय मिश्रांचे केंद्रीय मंत्रिपद धोक्यात; राजीनाम्यासाठी राज्यातील भाजप नेते दिल्लीत

लखीमपूर खेरी येथील घटनेनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला असून राज्यातील भाजप नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्रिपुत्राने चिरडल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याला अटक करण्यात आली असून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, विरोधकांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेण्याची मागणी लावून धरली आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून हे प्रकरण अधिक वाढण्याची भिती भाजप नेत्यांना वाटत आहे.

दरम्यान, या घटनेत अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक झाल्यानंतर भाजप नेते अजय मिश्रा यांच्यापासून दूर राहत आहेत. उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी नेतागिरीचा अर्थ फॉरच्युनर गाडीखाली लोकांना चिरडणं, त्यांना लुबाडणं असा होत नाही, तुम्ही कसे वागता हे पाहून जनता मत देत असतं, असं भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत वक्तव्य करत मिश्रा यांना घरचा आहेर दिला.

स्वतंत्र देव सिंह हे केंद्रीय नेतृत्त्वाच्या पाठिंब्यामुळेच असं बोलले असावेत, असं भाजप नेत्यांना वाटत आहे. दरम्यान, राज्यातील भाजपचे नेते सोमवारी दिल्लीत केंद्रीय नेतृत्त्वाला भेटायला गेले. विरोधी पक्ष सातत्याने अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत असून त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे मिश्रा यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेत्यांची आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील अजय मिश्रा यांच्यावर कारवाी व्हावी या मताचे आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून त्यांना कुठल्याही प्रकारे हे प्रकरण तापलेलं परवाडणारं नाही आहे.

मुलाची पोलीस कोठडीत रवानगी

लखीमपूर खिरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती. कोर्टाने आशिष मिश्राला १२ ते १५ ऑक्टोबरपर्यंत अशी तीन दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली आहे.

 

First Published on: October 12, 2021 1:57 PM
Exit mobile version