महाराष्ट्राचा बिहार झालाय, कसबा पेठेत दहशत निर्माण केली जातेय; नाना पटोलेंचा घणाघात

महाराष्ट्राचा बिहार झालाय, कसबा पेठेत दहशत निर्माण केली जातेय; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई – भाजपाने महाराष्ट्राचा बिहार केला आहे. पोलिसांच्या मदतीने त्यांनी मतदारांना पैसे वाटले. तडीपार लोकांना सोबत घेऊन कसबा पेठेत दहशत निर्माण केली, असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद कधीच नव्हता. वादाचं वातावरण निर्माण झालं आहे. २ मार्चला येणाऱ्या निकालात महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जिंकतील, असंही नाना पटोले म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट असून कापूस, धान, तुर, मका, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देण्यात कमी पडले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारला सभागृहात जाब विचारू व शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारला भाग पाडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

राज्यातील शेतकऱ्याची स्थिती भयावह असताना शिंदे-फडणवीस सरकार मात्र राज्यपालांच्या भाषणातून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. सरकारने हमी भावाप्रमाणे कांद्याची खरेदी केली पाहिजे. मका, हरभरा, कापूस, सोयाबीन, धानसुद्धा कमी दराने खरेदी केला गेला. आता शेतकऱ्यांकडचे धान संपल्यानंतर खासगी व्यापाऱ्यांनी धानाची किंमत दुप्पट केली. अशीच परिस्थिती इतर शेतमालाचीही आहे. शेतमालाला भाव नाही व शेतीला लागणारे साहित्य व वीज महाग झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत पण शिंदे फडणवीस सरकार मात्र झोपलेले आहे. राज्यातील ईडी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, २०१४ साली केंद्रात भाजपाची सरकार आल्यापासूनच देशात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु असून भाजपा सत्तेचा दुरुपयोग करत आहे. देशात सध्या अघोषीत आणीबाणी असून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात आहे. लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाविरोधात तीव्र संताप आहे, या संतापाचा उद्रेक झाल्याचे आपल्याला लवकरच दिसेल, असेही पटोले म्हणाले.

First Published on: February 27, 2023 3:49 PM
Exit mobile version