काँग्रेसचा गोव्यामध्ये सत्तास्थापनेचा दावा!

काँग्रेसचा गोव्यामध्ये सत्तास्थापनेचा दावा!

गोव्यामध्ये काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता राज्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. सोमवारी (आज) काँग्रेसच्या १४ आमदारांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भवनात हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यपाल कार्यालयात रितसर पत्र देखील दिले. या पत्रावर चौदाही आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ‘राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आम्हाला निमंत्रण द्यावे’ असे काँग्रेसचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (उद्या) राज्यपाल काँग्रेसच्या आमदारांना भेटीसाठी वेळ देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ‘गोव्यात नेतृत्व बदलणार नाही’ अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतली असताना, दुसरीकडे काँग्रेस पक्षाने गोव्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीकोनातून हालचाली सुरु केल्या आहेत.


वाचा : पर्रिकरच राहणार गोव्याचे मुख्यमंत्री

काँग्रेस सत्तेसाठी सक्षम आहे…

‘गोव्यात आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्या’ अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे. याशिवाय भाजपमधील काही आमदारही आम्हाला पाठिंबा देऊ शकतील, असा दावा त्यांनी केला आहे. पर्रिकरांच्या अनुपस्थितीमध्ये काँग्रेस सरकार चालवण्यासाठी सक्षम असल्याचेही काँग्रेस पक्षाच्या आमदारांचे म्हणणे आहे. गोवा विधानसभेतील एकूण ४० जागांपैकी १४ जागांवर भाजपचे आमदार आहेत, तर मागोप आणि जीएफपीचे प्रत्येकी ३-३ आमदार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे १६ आमदार असून, राष्ट्रवादीचा १ आमदार गोवा विधानसभेत आहे.


वाचा : आता गोव्यात चालणार ‘Goa Miles’

मुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्री पद दुसऱ्याकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पर्रिकरांची प्रकृती खालवल्यामुळे ते पुन्हा अमेरिकेला जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयातच उपचार होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी मनोहर पर्रिकर यांच्याशी चर्चा केली. भाजप देखील पर्रिकरांच्या जागी तात्पुरत्या पर्यायाच्या शोधात आहेत.

First Published on: September 17, 2018 4:58 PM
Exit mobile version