प. बंगालमध्ये पावसाचा गहजब, वीज कोसळून १० जणांचा अंत

प. बंगालमध्ये पावसाचा गहजब, वीज कोसळून १० जणांचा अंत

विजांचा गड-गडाट (फोटो सौजन्य- wordpress.com)

पश्चिम बंगालमध्ये रविवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसासोबत विविध जिल्ह्यात वीज कोसळून घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. बंकुरा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

वीज कोसळून १० जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या काही जिल्ह्यांत वीज कोसळून तब्बल १० जणांचा मृत्यू झाला आहे. यात बंकुरा जिल्ह्यातील ४ व्यक्ती, हुगळी जिल्ह्यातील ३ तर पश्चिम मिदनापूर, बिरहम आणि परगना जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

शेतात काम करताना मायलेकीचा मृत्यू

बंकुरा जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांममध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ४ पुरुषांसह एक स्त्री आणि तिच्या मुलीचा समावेश आहे. ही स्त्री आणि तिची मुलगी राजग्राम गावातील आहे. शेतात काम करत असताना अचानक कोसळलेल्या विजेमुळे या दोघींचा मृत्यू झाला. इतर मृतांमध्ये नित्यानंदपूर गावातील एक व्यक्ती आणि पुनिसोल गावातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

तरूण खेळाडूचा दुर्दैवी अंत

जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुण खेळाडूचा देखील अशाच एका घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण मैदानावर क्रिकेटची प्रॅक्टिस करत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. एका तरूण खेळाडूचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यामुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या दुर्घटनांमध्ये जखमी किंवा मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आर्थिक किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील मदत देण्यासंदर्भात शासकीय स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाल्याचं वृत्त नाही.

First Published on: June 13, 2018 7:18 AM
Exit mobile version