हाथरस प्रकरण ताजे असताना मध्यप्रदेशात अल्पवयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार

हाथरस प्रकरण ताजे असताना मध्यप्रदेशात अल्पवयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना मध्यप्रदेशातून देखील अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील खारगाव जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण तिला शेतात नेले. त्यानंतर त्या मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान उत्तर प्रदेशात एका १९-२० वर्षीय तरूणीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे आणि तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश हादरला आहे.

असा घडला प्रकार

मंगळवारी रात्री तिघे नराधम मारुगडमध्ये त्या मुलीच्या घरी आले आणि त्यांनी पाणी मागितले. यावेळी त्या मुलीच्या घरात हाणामारी सुरू झाली. तेव्हा मदत करण्यासाठी धावून आलेल्या मुलीच्या भावाला ढकलून दिले. त्यानंतर या तिघांनी मुलीला आपल्यासोबत नेले, अशी माहिती मुलीच्या भावने दिली. मुलीचे अपहरण करून तिला शेतात नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून ते आरोपी तेथून पळून गेले, अशी माहिती बुधवारी पोलिसांनी पत्रकारांना दिली.

आपल्या बहिणीला पळवून नेताना बघितल्यानंतर भावाने मदतीसाठी लोकांना आवाज दिला आणि भावाने आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तसेच, पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी धाव घेतली आणि फिर्याद दिली आहे. यात सहभागी आरोपींना अटक करण्यासाठी शोध सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच घडली होती ‘ही’ घटना

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. हाथरसच्या चंदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर गावातीलच ४ नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले.

यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र, तिची तब्येत अधिक बिघडल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचे कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केले होते.


Hathras Gangrape : निर्भया, कोपर्डीची पुनरावृत्ती; हाथरस घटनेने हादरला समाज
First Published on: October 1, 2020 8:05 AM
Exit mobile version