रोडरोमियोंवर ‘स्मार्ट झुमके’ करणार मिरची बुलेटची बरसात

रोडरोमियोंवर ‘स्मार्ट झुमके’ करणार मिरची बुलेटची बरसात

देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने वाराणसीमधील एका तरुणाने यावर नामी उपाय शोधून काढला आहे. या तरुणाने असे झुमके तयार केले आहेत ज्यांना स्पर्श करताच त्यातून मिरचीच्या गोळ्या समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावर बरसणार आहेत. यामुळे महिलांची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चाप बसेल असा दावा या तरुणाने केला आहे. श्याम चौरसिया असे त्याचे नाव आहे.

श्याम वाराणसीतील पहाडिया भागातील अशोका इन्स्टीट्यूट मथील रिसर्च अँड डेव्लपमेंट विभागात काम करतो. सतत काहीतरी नवीन करण्याचा त्याला ध्यास आहे. यातूनच महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करावे असा विचार त्याच्या मनात आला. त्यातूनच मग त्याने महिला कानात घालत असलेले असे झुमके तयार केले ज्यांच्या पोकळीत मिरची पावडर पासून तयर करण्यात आलेल्या छोटया गोळ्या दडवता येतात. महिलेने संकटकाळी या झुमक्यांना स्पर्श करताच या मिरचीच्या गोळ्या एकामागोमाग एक याप्रमाणे समोरच्या व्यक्तिच्या चेहऱ्यावर फेकल्या जातात व फुटतात. डोळ्यात मिरची पावडर जाताच समोरची व्यक्ती चेहरा झाकून पळून जाते. असा दावा त्याने केला आहे.

या कानातल्यांना त्याने स्मार्ट झुमके असे नाव दिले आहे. यात इव टचिंग डिवाईस आहे. जे दिसताना आकर्षक कानातल्यांसारखे दिसतात. यात एक बटन बसवण्यात आले आहे. हे बटन दाबताच त्यातील मिरचीच्या छोट्या गोळ्या बाहेर पडणार आहेत. विशेष म्हणजे या झुमक्यांना महिलेने स्पर्श करताच १०० आणि ११२ क्रमांकावर कॉल जाणार आहे. जेणेकरून महिलेला पोलिसांची मदतही तात्काळ मिळेल. हे झुमके ब्लू टूथलाही जोडता येणार आहेत.

हे झुमके तयार कऱण्यासाठी चौरसिया यांना चार महिने लागले . वजनाने हलक्या असलेल्या या कानातले ३ इंचाचे असून वजन ४५ ग्रॅम आहे. याची किंमत ४५० रुपये आहे.

First Published on: March 11, 2020 1:51 PM
Exit mobile version