केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकामागे मोदी नाहीत, खुद्द ममता बॅनर्जींचा निर्वाळा

केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकामागे मोदी नाहीत, खुद्द ममता बॅनर्जींचा निर्वाळा

पंतप्रधान मोदी, अमित शाह देशातील सिंडिकेट, ममता बॅनर्जींचे मोदींना प्रत्युत्तर

कोलाकाता : केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकाविरोधातील प्रस्ताव पश्चिम बंगाल विधानसभेत मंजूर करण्यात आला. यावेळी भाषण करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. पण त्याचबरोबर अन्य भाजपा नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. या यंत्रणांच्या कथित अतिरेकामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असेल, असे मला वाटत नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला आहे.

ममता बॅनर्जी सरकारने सोमवारी विधानसभेत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग आणि अतिरेक याविरोधात निषेध प्रस्ताव सादर करण्यात आला. आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. भाजपाने या प्रस्तावाचा विरोध केला. प्रस्तावच्या बाजूने 189 तर, विरोधात 69 मते पडली. भाजपा नेत्यांचा एक गट आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहे. भाजपाचे काही स्थानिक तसेच केंद्रीय नेते आपल्या सरकारविरोधात कटकारस्थान करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयच्या भीतीने उद्योगपती देश सोडून जात आहेत. मोदी असे काही करणार नाहीत, असे मला वाटते. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल की, सीबीआय आता पीएमओला (पंतप्रधान कार्याल) रिपोर्ट करीत नाही. ही यंत्रणा गृह मंत्रालयाला रिपोर्ट करते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

राज्याच्या प्रत्येक मंत्री, नेता आणि आमदारांचे फोन टॅप केले जात आहेत. यासंदर्भात आपल्याला पंतप्रधानांना काही सांगायचे नाही. कालच त्यांचा वाढदिवस साजरा झाला, असे सांगून पक्षातील या नेत्यांना आवर घालण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना केले. तसेच, केंद्र सरकारचा अजेंडा आणि पार्टीचा राजकीय हेतू यांची गल्लत होऊ नये, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. सध्याचे केंद्र सरकार हुकूमशाहा पद्धतीने कारभार करत आहे. हा प्रस्ताव कोणत्याही व्यक्तिविशेष करता नसून केंद्रीय तपास यंत्रणांच्या पक्षपाती कामकाजाविरोधात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नारद स्टिंग आणि सारधा चिटफंड प्रकरणांचा उल्लेख करून ममता म्हणाल्या, यामध्ये तृणमूलच्या अनेक नेत्यांविरोधात कारवाई झाली आहे. या प्रकरणांमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांच्या निवासस्थानी कितीवेळा छापे पडले किंवा चौकशी झाली, असा सवाल करत केंद्रीय यंत्रणांच्या भूमिकेबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली. तुम्ही माझ्या हाती ईडी आणि सीबीआय देऊन 24 तासांचा अवधी द्यावा, मग मी दाखवून देईन की कोठून आणि किती रोकड सापडते ते, असे आव्हानच त्यांनी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना दिले. तर, अशा प्रकारे सीबीआय आणि ईडी विरोधातील प्रस्ताव विधानसभेत आणणे हा विधानसभा नियमांच्या विरोधात आहे, असे सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले.

First Published on: September 19, 2022 10:08 PM
Exit mobile version