दुर्गा विसर्जनावेळी पुरातून तब्बल 9 जणांचे प्राण वाचवणारा मोहम्मद माणिक; ज्याचे पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

दुर्गा विसर्जनावेळी पुरातून तब्बल 9 जणांचे प्राण वाचवणारा मोहम्मद माणिक; ज्याचे पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी माल नदीला अचानक आलेल्या पुरात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. यावेळी सुमारे 80 जणांची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींपासून ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासोबतच त्यांना आर्थिक मदत जाहीर केली.

या घटनेवेळी एक व्यक्ती अशी होती जिने कोणताही स्वार्थ मनात न ठेवता पुरात अडकलेल्या लोकांची जीव धोक्यात घालून मदत केली. 28 वर्षीय मोहम्मद माणिक असे या व्यक्तीचे नाव आहे. माणिक हे दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा विसर्जन पाहण्यासाठी माळ नदीवर गेले होते. यावेळी नदीला अचानक आलेल्या पुरात अनेक लोक वाहून गेले. यावेळी वाहून जाणाऱ्या लोकांना पाहताच माणिक यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली आणि बुडणाऱ्या लोकांना वाचवले.

माणिक यांनी वाचवले 9 जणांचे प्राण

या घटनेवेळी माणिक यांनी किमान 9 लोकांचे प्राण वाचवल्याचे उपस्थित लोकांचे म्हणणे आहे. ज्यामध्ये 3 मुले आणि 4 महिलांचा समावेश आहे. याशिवाय एक जोडपंही होतं ज्यांचा माणिक यांनी जीव वाचवला आहे. टेलीग्राफ या इंग्रजी वेबसाइटनुसार, माणिक सांगतात की, मी लोकांना वाहत जाताना पाहिलं त्यांच्यामध्ये माझ्या मुलाएवढ्या लहान मुलांचाही समावेश होता. मी त्यांना असे वाहत जाताना पाहू शकत नव्हतो.त्यामुळे मी नदीत उडी मारून बुडणाऱ्यांचे प्राण वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मी निश्चित आकडा सांगू शकत नाही पण हो मी अनेकांना किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला.

मोहम्मद माणिक हे वेल्डिंगचे काम करतात. त्याच्या कुटुंबात ते, त्यांची पत्नी, मुलं, वडील आणि एक भाऊ आहे. मालबाजारपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम तोशिमाला गावात माणिक राहतात. ते मुस्लिम असले तरी ते दरवर्षी दुर्गापूजेत सहभागी होतात. दरवर्षी दुर्गा विसर्जनासाठी ते त्यांच्या मित्रासोबत याठिकाणी येतात. यावर माणिक सांगतात की, मला अभिमान आहे मी ज्या लोकांना वाचवले त्यापैकी एकाचीही प्रकृती गंभीर नाही.


वर्षा बंगल्यासमोरून 10 वेळा फोन केले; पण.., दीपक केसरकरांचा आरोप


First Published on: October 10, 2022 7:15 PM
Exit mobile version