हो! अशी असते पैशांची अंघोळ!

हो! अशी असते पैशांची अंघोळ!

अहमदाबादमध्ये गायकावर लाखो रूपये उधळले

सोन्याने मढवणे, पैशांची उधळण हा शब्दप्रयोग सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्ही केव्हा पैशांची अंघोळ पाहिली आहे? आम्ही मस्करीत नाही तर गांभीर्याने विचारत आहोत! तुम्हाला विश्वास नाही ना बसत? तर मग पैशांची अंघोळ कशी असते हे आम्ही तुम्हाला दाखवतो.

गायकाला घातली पैशांची अंघोळ!

गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये एका मैफिलीत गायकावर लाखो रूपयांची उधळण केली गेली. त्यालाच आम्ही पैशांची अंघोळ म्हणत आहोत. गुरूवारी अहमदाबादमध्ये लोक दायरो या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्स्फूर्तपणे प्रेक्षकांनी या गायकावर लाखो रुपयांची उधळण केली. १० रूपये ते ५०० रूपयांपर्यंतच्या नोटा या गायकावर उधळल्या गेल्या. भाजप नेते जितूभाई वाघनी कार्यक्रमस्थळी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रेक्षकांनी देखील गाण्याच्या तालावर ठेका धरल्याचे व्हिडिओमध्ये पाहायाला मिळत आहे.

पैशांची उधळण करण्यामागे गायकाला दाद देणे हाच उद्देश नसून संस्थांसाठी निधी उभारण्याचा उद्देशही असल्याचे यावेळी गायक गिरीराज गांडवी यांनी सांगितले. ‘पैसे उधळत लोक संगीतावर आणि गायकाप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करतात’, अशी प्रतिक्रिया भाजप नेते जितूभाई वाघनी यांनी दिली आहे. शिवाय जमा झालेला पैसा चांगल्या कामासाठी वापरला जात असल्याचे देखील वाघनी यांनी यावेळी सांगितले.

अशा प्रकारे पैशांची उधळण योग्य?

गायकावर पैसे उधळणे हा प्रकार काही नवीन नाही. यापूर्वी देखील अहमदाबाद, सुरतमध्ये अशाच प्रकारे पैशांची उधळण करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. पैशांची अशा प्रकारे उधळण योग्य की अयोग्य? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. सामाजिक कामासाठी पैसे द्यायचे असतील तर ते उधळण्याची गरज काय? असा प्रश्न सध्या समाजातील काही स्तरातून विचारला जाऊ लागला आहे. संस्थेसाठी किंवा सामाजिक कामासाठी पैसे द्यायचे असतील तर मग दान करून किंवा चेकने सुद्धा देता येतील, असे मत सुद्धा व्यक्त केले जात आहे.

First Published on: June 8, 2018 7:06 AM
Exit mobile version