एक मच्छर ट्रेन रुका देता है…, प्रवासादरम्यान खासदाराला डास चावल्याने प्रशासनाची उडाली भंबेरी

एक मच्छर ट्रेन रुका देता है…, प्रवासादरम्यान खासदाराला डास चावल्याने प्रशासनाची उडाली भंबेरी

ट्रेनमधून प्रवास करताना कधीकधी आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. मग ती गर्दी असो, कधी पाणीटंचाई असो, पंखे खराब असो किंवा डब्यामध्ये असणारी अस्वच्छता… याचा परिणाम थेट ट्रेनमध्ये असणाऱ्या प्रवाशांना होतो. बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचा ‘एक मच्छर आदमी को’… हा डॉयलॉग तुम्ही ऐकलाच असेल. परंतु असाच एक किस्सा हा ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका पक्षातील नेत्यासोबत घडला असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एका खासदाराला डास चावल्याने एकच खळबळ उडाली. इटाहचे खासदार राजवीर सिंह लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावरून दिल्लीला निघालेल्या गोमती एक्स्प्रेस (१२४१९) ट्रेनमध्ये प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान त्यांना डास चावला. मग काय या खासदाराने चक्क ट्रेनच थांबवली आणि यासंबंधीत तक्रारही दाखल केली. त्यामुळे संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली.

ट्रेन थांबवल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांना याबाबत माहिती दिली असता संपूर्ण डब्याची साफसफाई करण्यात आली. तसेच डब्याची साफसफाई झाल्यानंतरच गाडी तिथून पुढे रवाना करण्यात आली. खासदार राजवीर सिंग यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मान सिंह यांनी ट्विटरवर ट्रेनमध्ये डास चावल्याची तक्रार केली होती.

खासदार राजवीर सिंह ट्रेनच्या पहिल्या एसी डब्यात प्रवास करत होते. ट्रेनचे बाथरूम अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे खासदारांना बसणेही कठीण झाले आहे. या ट्विटनंतर अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेतली आणि ट्रेन उन्नाव येथे थांबवण्यात आली. संपूर्ण डब्यात फवारणी करण्यात आली. त्यानंतर उन्नाव रेल्वे स्थानकावरून ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात आली.

सर्वसामान्य प्रवाशांना अशा समस्यांशी सतत झगडावे लागते. परंतु सर्वसामान्यांचे अधिकाऱ्यांकडून ऐकले जात नसल्याचे लोक सांगतात. पण एखाद्या नेत्याला काही अडचण किंवा समस्या आली की, प्रशासनाकडून तत्काळ कारवाई करण्यात येते.


हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन; पाहा कशी आहे


 

First Published on: April 25, 2023 4:31 PM
Exit mobile version