पंतप्रधान आपले आश्वासन पूर्ण करु शकत नाहीत, विजेंदर सिंगची टीका

पंतप्रधान आपले आश्वासन पूर्ण करु शकत नाहीत, विजेंदर सिंगची टीका

संपुर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसताय. बॉलिवूडचे सेलिब्रेटींसोबत खेळाडू देखील विविध पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. गौतम गंभीर, सनी देओल, उर्मिला मातोंडकर नंतर आता प्रसिद्ध बॉक्सर विजेंदर सिंगनेही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना विजेंदर सिंगने मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच दक्षिण दिल्लीतून काँग्रेसचे उमेदवारी पद मिळाल्याने लोकांची सेवा करण्याची संधी कॉंग्रेसने दिल्याबद्दल विजेंदर आनंदी आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या विजेंदरचे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चांगले संबंध होते. त्यांच्या या संबंधाचे फोटो सोशल मीडियावर ही आहेत.

यंदा मात्र काँग्रेसने विजेंदरला उमेदवारी दिल्याने मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांशी खोटं बोलले, मुखवट्यामागे काय आहे याची कल्पना नव्हती, असा टोला विजेंदरने लगावत यंदा मला देशात कुठेही मोदी लाट दिसत नाही असे देखील म्हटले.

आश्वासने अपुर्णच

यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आपण काळा पैसा भारतात आणू, ज्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील, असे म्हटले होते. नरेंद्र मोदी आपले आश्वासन पूर्ण करु शकत नाहीत, अशीही टीका बॉक्सर विजेंदर सिंगने केली आहे.

देशवासियांसाठी काहीतरी करण्याची संधी

दक्षिण दिल्लीतून विजेंदरचा सामना भाजपच्या रमेश बिधुडी आणि आम आदमी पक्षाते राघव चड्डा यांच्याशी होणार आहे. दिल्लीत १२ मेला मतदान पार पडणार आहे. राजकारणात एंट्री केल्यानंतर विजेंदरने ट्वीट केले की, बॉक्सिंगमध्ये आपल्या करिअरमधील २०हून अधिक वर्षांमध्ये मी माझ्या देशाचा गौरव केला आहे. आता वेळ आहे की देशवासियांसाठी काहीतरी करण्याची. मला लोकांची सेवा करायची आहे. मला दिलेल्या संधीचा मी स्वीकार करतो आणि काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे आभार मानतो.

First Published on: April 24, 2019 1:54 PM
Exit mobile version