बिहार निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच भाजपचे स्टार प्रचारक

बिहार निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच भाजपचे स्टार प्रचारक

देवेंद्र फडणवीस यांची माहिती

बिहार निवडणुकीत भाजपचे एकमेव स्टार प्रचारक असतील आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, असे स्पष्ट करताना बिहार निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आम्हाला कंगना रानौतची गरज नाही. त्यामुळे त्याबाबतच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘बिहार निवडणुकीत प्रचारासाठी आम्हाला दुसर्‍या कोणत्याही स्टार व्यक्तीला बोलावण्याची आवश्यकता नाही. देशाचे सुपरस्टार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपसाठी सर्वात मोठे स्टार आहेत. बिहारमध्ये प्रचारासाठी ते एकटेच पुरेसे आहेत. त्यांच्यावर जनतेचा जो विश्वास आहे त्याच्या जोरावरच आम्ही देशात विजय मिळवला आहे आणि सर्वत्र विजयांची मालिका सुरू आहे’, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजप कंगना रानौतला पाठिंबा देत आहे व बिहारमध्ये कंगना भाजपसाठी स्टार प्रचारक म्हणून प्रचारात उतरणार असल्याच्या बातम्यांत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवरील आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी बिहार निवडणुकीत भाजपसाठी एकमेव स्टार प्रचारक असतील आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, असे ठामपणे सांगतानाच शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात राजकारण केले जात आहे आणि बिहार निवडणुकीसाठीच महाराष्ट्र सरकारवर आरोप केले जात असल्याबद्दल विचारले असता तो आरोपही फडणवीस यांनी फेटाळला. सुशांत हा बॉलिवूडमधील एक तरुण आणि उमदा कलाकार होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणूनच त्याच्या मृत्यूमागील सत्य पुढे यायला हवे व त्याला न्याय मिळायला हवा, इतकीच भाजपची अपेक्षा आहे. केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू झाल्यानंतर आता लवकरच सत्य समोर येणार आहे, असे नमूद करतानाच या प्रकरणाचा बिहारच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही. आम्हाला या मुद्याचे अजिबात राजकारण करायचे नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

First Published on: September 15, 2020 7:01 AM
Exit mobile version