सत्ता स्थापनेच्या गोंधळात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल गेले कुणीकडे?

सत्ता स्थापनेच्या गोंधळात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल गेले कुणीकडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल आणि शरद पवार

महाराष्ट्रातले सरकार स्थापन करण्यासाठी आता दिल्लीत जोरदार खलबतं सुरु आहेत. बैठका वर बैठका होतायत. मात्र निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यातला दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला शिवसेना आता या चर्चेत बॅकफुटवर दिसत असून सत्ता स्थापनेची चर्चा काँग्रेस-राष्ट्रवादीभोवती फिरताना दिसतेय. मात्र या सर्व चर्चा गुऱ्हाळात राष्ट्रवादी काँग्रेसचा दिल्लीतील चेहरा कुठेही दिसत नाही. राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार प्रफुल पटेल हे दिल्लीत शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून पक्षासाठी नेहमीच लढताना दिसतात. मात्र सोमवार पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झालेले आहे. या दरम्यान शरद पवार-सोनिया गांधी भेट झाली, आज मोदी-पवार भेट होत आहे. मात्र या सर्व गोंधळात प्रफुल पटेल गेले कुणीकडे? अशी जोरदार चर्चा दिल्लीच्या वर्तुळात होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले प्रफुल पटेल हे शरद पवारानंतर पक्षातले एक वजनदार नेते समजले जातात. पवारांनंतर ते राष्ट्रीय स्तरावर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतात. २०१४ साली विधानसभेचा निकाल लागत असताना भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याबाबत त्यांनीच माध्यमांना सांगितले होते. ज्यामुळे शिवसेनेला ७० दिवस सत्तेपासून लांब राहावे लागले होते. यावेळी देखील प्रफुल पटेल हे सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात बसणार आणि विरोधी पक्षनेता आमचाच होणार, असे ठामपणे सांगत होते. मात्र मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रफुल पटेल दिसेनासे झाले आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून एकमत झाल्यानंतर राज्यात किमान समान कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांच्यावतीने एक समिती बनविण्यात आली. या समितीमध्ये प्रामुख्याने राज्यातील नेते होते. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करताना प्रफुल पटेल दिसले नाहीत. त्यानंतर दिल्ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेतानाही, पवार यांनी प्रफुल पटेल यांना सोबत घेतले नव्हते.

उद्धव ठाकरेंची भेट घेताना प्रफुल पटेलांना लांब ठेवले

मुंबईत यशवंतराव चव्हाण येथे राष्ट्रवादीची बैठक सुरु असताना दि. ११ नोव्हेंबर रोजी शरद पवार काही निवडक नेत्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी प्रफुल पटेल हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उपस्थित असतानाही त्यांना या बैठकीसाठी पवारांनी सोबत घेतले नाही. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आणि सुनील तटकरे या निवडक नेत्यांसोबत पवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

प्रफुल पटेलांच्या मागे ईडीची पीडा

खासदार प्रफुल पटेल यांचे वरळी येथे सीजे हाऊस नामक इमारतीमध्ये निवासस्थान आहे. या इमारतीचे बांधकाम प्रफुल पटेल यांच्या कंपनीने केले होते. मात्र ही मालमत्ता दाऊदशी संबंधित असलेल्या इकबाल मिर्चीकडून विकत घेतल्यामुळे आणि त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणी त्यांची ईडी चौकशी झाली असून अजूनही हे प्रकरण ताजे आहे. पटेलांच्या चौकशीत थेट दाऊदच्या नावाचा संबंध आल्यामुळे कदाचित पक्षाने महत्त्वाच्या घडामोडींपासून त्यांना दूर ठेवले असावे, असाही एक विचार पक्षातील काही पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. तर प्रफुल पटेल यांचा शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास विरोध आहे, त्यामुळेच त्यांना बाजुला ठेवले असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात पक्षात होत आहे.

First Published on: November 20, 2019 12:46 PM
Exit mobile version