CBI : निवडणुकीच्या मोसमात अजित पवार गटासाठी आनंदाची बातमी; या बड्या नेत्याला भ्रष्टाचार प्रकरणी क्लीनचीट

CBI : निवडणुकीच्या मोसमात अजित पवार गटासाठी आनंदाची बातमी; या बड्या नेत्याला भ्रष्टाचार प्रकरणी क्लीनचीट

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी ऐन निवडणुकीच्या मोसमात आनंदाची बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांना एका भ्रष्टाचार प्रकरणात क्लीनचीट मिळाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात प्रफुल पटेलविरोधातील प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळे प्रफुल पटेल यांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल हे यूपीए सरकारच्या काळात नागरी विमान वाहतूक मंत्री होते. तेव्हा त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. 2017 मधील या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत होती. या घोटाळ्यात सीबीआयने दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात केस बंद करण्यासाठी अर्ज केला आहे. या कथित घोटाळ्यात सबळ पुरावे मिळाले नसल्याचा अहवाल सीबीआयने कोर्टात दाखल केला.

हेही वाचा : EOW : अजित पवारांना दिलासा! शिखर बँक घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत जाणाऱ्या नेत्यांपैकी प्रफुल पटेल हे आघाडीवर होते. खरा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच असल्याचा दावा प्रफुल पटेल यांनीच केला होता. पटेल शरद पवारांसोबत होते, तेव्हा 2017 मधील भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास आणि चौकशी सुरु होती. आता ते अजित पवारांसोबत आणि भारतीय जनता पक्षासोबत आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रफुल पटेलांना क्लीनचीट मिळाली असल्याने अजित पवार गटात आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा : Liquor Policy Scam : अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ; 1 एप्रिलपर्यंत ईडीच्या ताब्यात

अजित पवारांनाही याच महिन्यात दिलासा

याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अजित पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणी दिलासा मिळाला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी ईओडब्ल्यूने क्लोजर रिपोर्ट सादर केला. शिखर बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अजित पवार हे या बँकेचे अध्यक्ष असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप होता. मात्र या कथित घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) विशेष न्यायालयात केला. पोलिसांनी या प्रकरणात ‘सी’ समरी रिपोर्ट देखील सादर केला आहे.

First Published on: March 28, 2024 6:27 PM
Exit mobile version