अध्यक्ष निवडीची घाई नाही, आभाळ कोसळत नाहीये

अध्यक्ष निवडीची घाई नाही, आभाळ कोसळत नाहीये

अध्यक्ष निवडीची कसलीही घाई नाही, आभाळ कोसळत नाहीये, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिणार्‍या नेत्यांवर केली आहे. काँग्रेसमधील कार्यकारी समितीच्या बैठकीत अध्यक्ष निवडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला असला तरी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. पत्र लिहिलेल्या नेत्यांबद्दल विरोधी सूर लावला जाताना, पत्र लिहिलेले नेते आपली बाजू मांडताना दिसत आहेत.

युपीए सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी सोनिया गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावरून जे वादंग निर्माण झाले, त्यावर वृत्तसंस्थेशी बोलताना भूमिका मांडली. पत्र लिहिणारे नेते पक्ष नेतृत्वाच्या जवळचे आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळेच सोनिया गांधी यांनी असे सूचित केले की या नेत्यांनी पक्षाच्या मर्यादेत राहून या विषयावर चर्चा करायला हवी होती, असे खुर्शीद म्हणाले.

23 नेत्यांनी पत्रात उपस्थित केलेल्या काँग्रेस अध्यक्ष निवडीच्या मुद्यावर बोलताना सलमान खुर्शीद म्हणाले की, माझ्यासारख्या लोकांसाठी अगोदरपासूनच नेते आहे. सोनिया गांधी आमच्या नेत्या आहे. राहुल गांधी आमचे नेते आहेत. त्यामुळे माझ्या मते पक्षाध्यक्ष निवडण्याची घाई करण्यात कसलाही तर्क नाही. पक्षाध्यक्षांची निवड जेव्हा करता येईल तेव्हा होईल. त्यामुळे आभाळ कोसळतेय, असे मला दिसत नाहीये. पक्षाध्यक्ष निवडीची घाई कशासाठी केली जातेय, हे मला अजूनही कळत नाहीये, असे खुर्शीद म्हणाले.

लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाला मरगळ आल्याचे नमूद करत पक्षातील 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षांची निवड करण्याची मागणी केली होती. या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यात काँग्रेसच्या पुनर्बांधणीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. या पत्रानंतर काँग्रेसची बैठक झाली. त्यात यावर तोडगा काढण्यात आला. मात्र, त्यानंतर पत्रावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

First Published on: August 31, 2020 12:42 AM
Exit mobile version