संसदरत्नसाठी महाराष्ट्रातील ४ खासदारांना नामांकने; २५ मार्चला पुरस्कार होणार जाहीर

संसदरत्नसाठी महाराष्ट्रातील ४ खासदारांना नामांकने; २५ मार्चला पुरस्कार होणार जाहीर

संसदरत्न २०२३ पुरस्कारासाठी मंगळवारी नामांकने जाहीर करण्यात आली. यामध्ये १३ खासदारांचा समावेश असून त्यातील ४ खासदार महाराष्ट्रातील आहेत. १३ पैकी ८ खासदार लोकसभेचे असून ५ खासदार राज्यसभेचे आहेत. २५ मार्चला हे पुरस्कार देण्यात येतील.

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने १३ खासदारांची नामांकने जाहीर केली. नामांकने मिळालेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी, कुलदीप राय शर्मा, भाजपचे विद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मजुमदार, हिना गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांचा समावेश आहे, तर राज्यसभेतून सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, सपाचे विश्वंभर निषाद आणि काँग्रेसच्या छाया वर्मा यांना नामांकन मिळाले आहे.

वित्त समिती (लोकसभा समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा) आणि परिवहन, पर्यटन, संस्कृती समिती (राज्यसभा समितीचे अध्यक्ष व्ही. विजयसाई रेड्डी, वायएसआर काँग्रेस) यांना १७ व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकित करण्यात आले आहे.

नामांकन देण्याचे निकष काय?
लोकसभेचे ५४४ आणि राज्यसभेच्या २५४ खासदारांपैकी एका संसदरत्नाची निवड केली जाते. त्यासाठी काही निवडक नावे जाहीर केली जातात. यासाठी संसदेतील खासदारांची उपस्थिती, त्यांनी मांडलेली विधेयके, चर्चेतील सहभाग आदी विविध मुद्यांचा विचार करून खासदारांना नामांकन दिले जाते.

First Published on: February 22, 2023 3:30 AM
Exit mobile version