पाकचा कांगावा; पुलवामा हल्ल्यामध्ये ‘जैश’चा हात नाही

पाकचा कांगावा; पुलवामा हल्ल्यामध्ये ‘जैश’चा हात नाही

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी

पुलवामा हल्ल्याची धग अद्याप शांत झालेली नसताना पाकिस्तानने नवीन कांगावा सुरु केला आहे. ‘पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असू शकत नाही,’ असं वक्तव्य पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. पुलवामा हल्ला हा पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला असल्याचे ठोस पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तानकडून अशी ओरड केली जात आहे. बीबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेने स्वीकारली आहे, याबाबत तुमचं म्हणणं काय असं कुरैशी यांना विचारलं असता ते म्हणाले, की ‘जैश ए मोहम्मदने हे कृत्य केलेले नाही. आमच्या निकटवर्तीयांनी जैश ए मोहम्मदकडे विचारणा केली होती. मात्र, त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.’ आता जैशशी नक्की कुणी संपर्क साधला होता? हे सांगण्यास मात्र कुरैशींनी साफ नकार दिला.

मुलाखतीदरम्यान कुरैशी म्हणाले की, ‘युद्ध हा सद्य परिस्थितीमध्ये कुठल्याही समस्येवर तोडगा ठरू शकत नाही. एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्याने कोणत्याच समस्या सहजासहजी सुटणार नाहीत. युद्ध करणं हे नक्कीत आत्मघाती पाऊल ठरू शकते.’

कुरैशी यांच्या या कांगावखोरपणामुळे एकीकडे पाकिस्तान शांततेचा प्रस्ताव ठेवत असताना, दुसरीकडे मसूद अझहरबाबतचा त्यांचा आणि पर्यायाने पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड झाला. पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतावादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान भारताकडे पुरावे  मागत आहे. दरम्यान, समोर आलेल्या वृत्तानुसार मसूद अझहर हा पाकिस्तानातच आहे. मसूद आजारी असल्यामुळे घराबाहेर पडू शकत नाही, असा दावा मोहम्मद कुरैशी यांनी नुकताच केला होता.

First Published on: March 2, 2019 12:41 PM
Exit mobile version