पतंजलीने केलं ‘गायीचं दूध’ लॉंच

पतंजलीने केलं ‘गायीचं दूध’ लॉंच

पतंजलीने लाँच केलं गायीचं दूध

योगगुरु रामदेव बाबा यांची उत्पादने मोठ्या संख्येने बाजारात उपलब्ध आहेत. पतंजलीच्या खाण्यापासून ते दररोजच्या वापरातील सर्व वस्तू बाजारात मिळतात. तर आता पतंजली आयुर्वेद डेअरी सेक्टरने आज गायीचं दूध आणि दुग्धजन्य उत्पादने लॉंच केली आहेत. या गायीच्या दुधाचा प्रति लीटर भाव ४० रुपये असून बाजाराभावापेक्षा हे दूध दोन रुपयांनी स्वस्त आहे.

दूधाची उत्पादने

दिल्लीच्या तालकटोला स्टेडिअममध्ये ही उत्पादने लाँच करण्यात आली आहेत. या आधी पतंजलीचे तूप बाजारात उपलब्ध होते. मात्र आता दुधापासून दही, ताक आणि पनीर ही उत्पादने देखील लॉंच करण्यात आली आहेत.

हे आहे पतंजलीचे उद्दीष्ट

येत्या २०२० पर्यंत दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात सुमारे १ हजार कोटी रुपयांचा महसूल उत्पन्न करण्याचे पतंजलीचे उद्दीष्ट आहे. कंपनीच्या दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे आणि राजस्थानात दुधाच्या वितरणासाठी ५६ हजार किरकोळ विक्रेत्यांचा करार करण्यात आला आहे. तर २०१९ ते २०२० मध्ये प्रति दिन १० लाख लिटर दूध वितरण करण्याची कंपनीला अपेक्षा आहे. तसेच पहिल्याच दिवशी पतंजलीने चार लाख लिटर गायीच्या दुधाचं उत्पादन केल्याचं देखील म्हटलं आहे. त्याचप्रमाणे येत्या काळात पतंजली फ्लेवर्ड मिल्कही लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

५ लाख लोकांना मिळणार रोजगार

गायीच्या दुधासाठी सुमारे एक लाख शेतकरी आणि पशुपालक पतंजलीशी जोडले गेले आहेत. त्याचप्रमाणे पुढील नव्या उत्पादनांच्या लॉंचिंगनंतर सुमारे ५ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. येत्या काळात पतंजलीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देखील आणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on: September 13, 2018 10:46 PM
Exit mobile version