…म्हणून विरोधक घाबरताहेत; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला

…म्हणून विरोधक घाबरताहेत; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला

नवी दिल्लीः भ्रष्टाचार उघडकीस येईल म्हणून विरोधक घाबरत आहेत. भ्रष्टाचारविरोधी कारवाया थांबवण्यासाठी विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांना दणका दिला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना हाणला.

पंतप्रधान मोदी हे तेलंगणा दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सिकंदराबाद-तिरुपती या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही भ्रष्टाचार विरोधी कारवाई सुरु केली. आपल्याही फाईली उघडल्या जातील, अशी भीती काहींना वाटली. भ्रष्टाचार आणि घराणेशाही वेगळी आहे. भ्रष्टाचारविरोधी कारवाया थांबवण्यासाठी काही जणांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयानेही त्यांना दणका दिला, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, तेलंगणा सरकार सहकार्य करत नाही. त्यामुळे येथील विकास खुंटला आहे. याचा नाहक भुर्दंड जनतेला बसत आहे.

दरम्यान, राजकीय नेते सर्वसामान्यांपेक्षा मोठे नाहीत, असे खडेबोल सुनावत सर्वोच्च न्यायालयाने १४ विरोधी पक्षांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. सीबीआय, ईडीचा सत्ताधारी दुरुपयोग करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने यावर सुनावणी घेण्यास नकार दिल्याने ही याचिका मागे घेण्यात आली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड व न्या. जे. बी. पारधीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सर्वसामान्यांकडून पेन्शनचे पैसे घेतले आणि ते पैसे परत दिलेच नाहीत. याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले. आमच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले. या गुन्ह्यात अटक करु नका, असे आम्ही सांगितले तर चालेल का?, असा सवाल न्यायालयाने केला.

तुम्ही राजकीय नेत्यांना झुकते माप देणारी मार्गदर्शकतत्त्वे जारी करण्याची मागणी करत आहात. एखाद्यावर चुकीची कारवाई होत असेल तर त्याच्याकडे न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय आहे. प्रत्येकावर होणाऱ्या कारवाईचा तपशील स्वतंत्र असतो. त्यामुळे सर्वांसाठी सरसकट मार्गदर्शकतत्त्वे जारी केली जाऊ शकत नाही. पण जर सरसकट कारवाई होत असलेली प्रकरणे अथवा कारवाईने बाधित असलेला समूह न्यायालयात आला. तर न्यायालय मार्गदर्शकत्त्वे जारी करु शकतो, असे सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी स्पष्ट केले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर तेलंगणा दौऱ्यात निशाणा साधला.

First Published on: April 8, 2023 8:41 PM
Exit mobile version