PM Narendra Modi : मोदी म्हणाले, ‘तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो…’

PM Narendra Modi : मोदी म्हणाले, ‘तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो…’

देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासीयांना संबोधित केलं. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर (Corona Cases in India) आणि देशवासीयांच्या बिनधास्त वर्तनावर बोट ठेवक सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात काळजी न घेणाऱ्या लोकांना उद्देशून आवाहन केलं आहे. मोदी म्हणाले, ‘मला अनेक फोटोंमध्ये, व्हिडिओंमध्ये काही लोकं काळजी घेताना दिसत नाहीत. मास्क न वापरता किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता फिरताना दिसतात. सध्या उत्सवांचा काळ आहे. या काळात आपण स्वस्थ राहिलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला देखील स्वस्थ ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला हात जोडून तुमची प्रार्थना करतो. सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा आणि वेळोवेळी साबणाने हात धुवा. जोपर्यंत कोरोनावरची लस येत नाही, तोपर्यंत आपण काळजी घेण्याच्या बाबत चालढकल करता कामा नये’, असं मोदी यावेळी म्हणाले. (PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…

आपण सर्व भारतीयांना आत्तापर्यंत खूप मोठा प्रवास केला आहे. आर्थिक व्यवहार देखील हळूहळू सुरू झाले आहेत. उत्सवांच्या या काळात बाजारांमध्ये रोषणाई परतू लागली आहे. पण आपण हे विसरता कामा नये की लॉकडाऊन गेला असला, तरी कोरोना व्हायरल गेलेला नाही. भारतात होत असलेली सुधारणा अधिक चांगली करत राहायला हवी. देशात रिकव्हरी रेट जास्त असून मृत्यूदर कमी आहे. पण या काळात असं मानून चालू नका की कोरोनाची भिती कमी झाली आहे किंवा संकट कमी झालेलं आहे. अनेक फोटो आणि व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसत आहे की अनेक लोकांनी काळजी घेणं बंद केलं आहे किंवा ते बिनधास्त झाले आहेत. पण हे चुकीचं आहे. असं करून तुम्ही स्वत:ला, तुमच्या परिवाराला धोक्यात टाकत आहात.

इतर अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. पण ते पुन्हा वाढले आहेत. जोपर्यंत कोरोनावरची लस (Corona Vaccine) येत नाही, तोपर्यंत आपल्याला कोरोनाविरोधातल्या आपल्या लढाईला कमजोर होऊ द्यायचं नाही. भारतात कोरोनाच्या अनेक व्हॅक्सिनवर काम सुरू आहे. कोरोनाची लस जेव्हा येईल, तेव्हा ती प्रत्येक भारतीयापर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचवता येईल, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

उत्सवांचा काळ आपल्या आयुष्यात आनंदाचा काळ आहे. पण थोडीशी बेपर्वाई आपल्या वेगाला कमी करू शकते. आपल्या आनंदावर विरजण टाकू शकते. सुरक्षित अंतर, वेळोवेळी साबणाने हात धुणे आणि मास्क लावणे हे कटाक्षानं पाळा. मी हात जोडून तुम्हाला प्रार्थना करतो. मी तुम्हाला आनंदी, सुखी आणि स्वस्थ पाहू इच्छितो. त्यासाठी मी माध्यमांना आणि सोशल मीडियावरच्या लोकांनाही आवाहन करतो की तुम्ही जनजागृतीसाठी जितकं काम कराल, ती तुमच्याकडून देशवासीयांची सेवा असेल.

पाहा मोदींच्या लाईव्हचा संपूर्ण व्हिडिओ!

First Published on: October 20, 2020 6:07 PM
Exit mobile version