लडाखमध्ये घुसखोरी झालेली नाही, भारताचं सैन्य सक्षम – नरेंद्र मोदी

लडाखमध्ये घुसखोरी झालेली नाही, भारताचं सैन्य सक्षम – नरेंद्र मोदी

देशातल्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत चीनी घुसखोरीबद्दल आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चा केली. या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सुरक्षा, चीनची घुसखोरी आणि भारत सरकारची भूमिका यावर भाष्य केलं. ‘देशाच्या सैन्याच्या क्षमतेवर देशाचा पूर्ण विश्वास आहे. या बैठकीच्या माध्यमातून मी शहिदांच्या परिवारांना हा विश्वास देऊ इच्छितो की पूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. पूर्व लडाखमध्ये जे झालं, त्या ठिकाणी आपल्या सीमेमध्ये कुणीही घुसखोरी केलेली नाही किंवा आपली कोणतीही पोस्ट दुसऱ्या कुणाच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले २० जवान शहीद झाले. पण ज्यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं होतं, त्यांना आपल्या जवानांनी अद्दल घडवली आहे. त्यांचं हे शौर्य प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम कोरलेलं राहील’, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

चीनकडून सीमेवर जे काही केलं गेलं, त्यावरून देशात संतापाचं वातावरण आहे. पण आपलं सैन्य देशाच्या सुरक्षेत कोणतीही कसर सोडणार नाही. आपल्याकडे आज हे सामर्थ्य आहे की कुणीही आपल्या एक इंच जमिनीकडेही डोळे वर करून पाहू शकत नाही. आज भारतीय सैन्य प्रत्येक ठिकाणी सोबत पुढे वाटचाल करण्यासाठी सक्षम आहे. डिप्लोमॅटिक माध्यमातून चीनला भारताने आपला मुद्दा स्पष्ट केला आहे. भारताला शांतता आणि मैत्री हवी आहे. मात्र, देशाची स्वायत्तता आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.

सीमा भागात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला आपण प्राधान्य दिलं आहे. सैन्याला अत्याधुनिक सज्जता मिळावी, यावर देखील आपण भर दिला आहे. एलएसीमध्ये आपली पेट्रोलिंगची क्षमता वाढली आहे. सतर्कता वाढली आहे. त्यामुळे एलएसीवर होणाऱ्या हालचालींबाबत वेळीच माहिती मिळत आहे. ज्या भागांवर सुरुवातीला फारसं लक्ष नव्हतं, तिथे देखील आपले जवान लक्ष ठेवू शकत आहेत.

देशहित ही आपल्या सगळ्यांची पहिली प्राथमिकता राहिली आहे. आपलं सैन्य सीमांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सक्षम आहे. आपण त्यांना योग्य त्या कारवाईसाठी पूर्ण सूट दिली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वेळ दिला, त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या या सहभागामुळे जगाला जो काही संदेश जाणं आवश्यक आहे, तो जाईल.

First Published on: June 19, 2020 9:19 PM
Exit mobile version