CJI पदी न्यायाधीश N V Ramana; २४ एप्रिल रोजी शपथविधी

CJI पदी न्यायाधीश N V Ramana; २४ एप्रिल रोजी शपथविधी

CJI पदी मुख्य न्यायाधीश NV Ramana

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही. रमना हे देशाचे पुढचे सरन्यायाधीश असणार आहेत. एन.व्ही. रमना यांच्या नावाला मंगळवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली. राष्ट्रपतींच्या मंजुरीचे पत्रही सर्वोच्च न्यायालयात पाठविण्यात आले आहे. विद्यमान सरन्यायाधीश एस.ए. बोबडे हे २३ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असल्याने येत्या २४ एप्रिल रोजी न्यायाधीश एन.व्ही. रमना हे देशाच्या ४८ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती भवनात न्यायाधीश एन.व्ही. रमना यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश रमना यांचा कार्यकाल २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे. म्हणजेच रमना हे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी CJI (Chief Justice Of India) म्हणजेच देशाच्या सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. ज्येष्ठतेनुसार, मुख्य न्यायाधीश रमना हे सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या स्थानी आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश एन.व्ही. रमना हे CJI नंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. रमना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले असे न्ययाधीश असतील जे सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. न्यायाधीश रमना हे येत्या २४ एप्रिल रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील, यानंतर न्यायाधीश रमना हे २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत देशाचे सरन्यायाधीश राहतील.

न्यायाधीश एन व्ही रमना यांच्याबद्दल…

न्यायाधीश एन व्ही रमना यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्ण जिल्ह्यातील पोन्नवरम या गावात झाला. ते पहिल्यांदा १० फेब्रुवारी १९८३ रोजी वकील झाले होते. रमना यांची २७ जून २००० रोजी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. यानंतर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी रमना यांची दिल्ली उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी नियुक्ती झाली.

First Published on: April 6, 2021 12:00 PM
Exit mobile version