‘ॐ’ आणि ‘गाय’ शब्द ऐकताच काहींना करंट लागतो – पंतप्रधान

‘ॐ’ आणि ‘गाय’ शब्द ऐकताच काहींना करंट लागतो – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी पशुंच्या पाय आणि तोंडाचा रोग तसेच ब्रुसेलोसिससाठी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मथुरा येथे आले होते आहेत. यावेळी त्यांनी ‘ॐ’ हा शब्द कानावर पडताच काही लोकांचे कान उभे राहतात, काही लोकांनी ‘गाय’ हा शब्द ऐकला तर त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना करंट लागतो, अशा शब्दात विरोधकांवर टीका केली. देश १६ व्या, १७ व्या शतकात गेला आहे, असेच या लोकांना वाटते असे सांगताना, याच लोकांनी देशाचे वाटोळे केल्याचा घणाघात यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी

अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, दहशतवाद ही एक जागतिक समस्या बनली आहे. आज दहशतवाद ही एक विचारधाराच बनली आहे. या दहशतवादाची मुळे आपल्या शेजारीच वाढत आहेत. आम्ही याचा मोठ्या ताकदीने मुकाबला करत आहोत आणि पुढेही करत राहू, असे मोदी म्हणाले. दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे आणि आम्ही ते करूनही दाखवले, असेही मोदी पुढे म्हणाले.

या वर्षी २ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येकाने आपली घरे, आपली कार्यालये, आपली कार्यक्षेत्रे सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. आज स्वच्छता ही सेवा अभियान सुरू झाले असून राष्ट्रीय प्राणी रोग प्रतिबंधक कार्यक्रमदेखील सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधी यांचे गे १५० वे प्रेरणावर्ष आहे. स्वच्छता ही सेवा या मागे हीच भावना आहे. आजपासून सुरू होत असलेले हे अभियान विशेषत: प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्तीला समर्पित करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केद्रीय मंत्री गिरीराज सिंह, खासदार हेमा मालिनी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मोदी यांनी पशुंची देखभाल करण्यासाठी उभारलेल्या विशेष चिकित्सल्याची पाहणीदेखील केली.

कचरा गोळ्या करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मथुरा येथे प्लास्टिकचा कचरा गोळ्या करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि संवाद साधला. यावेळी मोदी यांनी महिलांना कचरा उचलण्यात मदतसुद्धा केली. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. याचाच भाग म्हणून मोदींनी कचरा गोळ्या करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संवाद साधला आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद मोदींच्या या सौजन्य भेटीची विविध सामाजिक माध्यमांवर चर्चा होते आहे.

First Published on: September 11, 2019 2:49 PM
Exit mobile version