सरन्यायाधीश चंद्रचूड यांना संरक्षण द्या; विरोधी खासदारांचे राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र

सरन्यायाधीश चंद्रचूड यांना संरक्षण द्या; विरोधी खासदारांचे राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र

गेल्या ९ महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू आहे. काल गुरूवारी (ता. १६ मार्च) या प्रकरणाचा शिंदे गट आणि ठाकरे गटाचा युक्तिवाद पुर्ण झाला असून या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. परंतु, मागील गेले दोन दिवस झालेल्या युक्तिवादामध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांच्या बाजूने कोर्टामध्ये तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला होता.

दरम्यान, या प्रकरणात राज्यपालांच्या निर्णयावरून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ताशेरे ओढल्याने काही नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात झाली आहे. याबाबतचे एक पत्र राज्यसभेतील खासदारांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पाठवले आहे. यामध्ये त्यांनी “महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या हितसंबंधांबद्दल सहानुभूती असलेल्या ट्रोल आर्मीने सरन्यायाधीशांविरोधात विरुद्ध आक्रमण सुरू केले आहे. सरन्यायाधीशांसाठी वापरण्यात येणारे शब्द आणि मजकूर घाणेरडा आणि निंदनीय आहे, ज्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखोंच्या संख्येने दृश्ये मिळविली आहेत,” असे खासदारांनी त्यांनी राष्ट्रपती यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना करण्यात आलेल्या ट्रोलिंगबद्दल तक्रार केली आहे. तसेच ट्रोल करणारे आणि त्यांच्यामागे असणाऱ्या लोकांविरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी विरोधी खासदारांकडून करण्यात आली आहे.

“आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताचे माननीय सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत आणि राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भातील महत्त्वाच्या घटनात्मक मुद्द्यावरून सुनावणी घेतली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या हितसंबंधांबद्दल सहानुभूती असलेल्या ट्रोल आर्मीने माननीय सरन्यायाधीशांच्या विरोधात हल्ला चढवला आहे. ट्रोलर्सनी सरन्यायाधीशांसाठी वापरलेले शब्द हे खालच्या पातळीचे असून हे खेदजनक आहे. ज्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो दृश्ये मिळविली आहेत,” असे या पत्रात लिहिण्यात आले आहे.

तसेच, “जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि सर्वोच्च न्यायालयासमोर आहे, अशा लोकांना सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा असेल तर ते चुकीचे आहे. आपले महामहिम आणि भारतातील घटनात्मक आणि वैधानिक अधिकारी हे भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचे आणि सजावटीचे रक्षण करण्यास बांधील आहेत. न्यायमूर्ती जे.एस. वर्मा यांनी विनीत नारायण मधील त्यांच्या प्रसिद्ध वाक्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, “तुम्ही इतके उच्च नाही कारण कायदा नेहमीच तुमच्या वर असतो,”

“हे देखील न्यायाच्या मार्गात ढवळाढवळ करणारे एक निर्लज्ज प्रकरण आहे” असे ठामपणे खासदारांकडून या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. या पत्रात पुढे खासदारांनी लिहिले आहे की, “आम्ही केवळ ट्रोल करणार्‍या व्यक्तींवरच नव्हे, तर त्यामागील लोकांवर, म्हणजे समर्थन आणि प्रायोजित करणार्‍यांवरही त्वरित कारवाईची अपेक्षा करतो. कायद्याचे पालन करणारे संसद सदस्य या नात्याने आम्ही दोषींवर तात्काळ कारवाईची अपेक्षा करतो, असे न झाल्यास प्रकरण उच्च पातळीवर न्यावे लागेल,” असे या पत्राच्या माध्यमातून राष्ट्रपतींना सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आलेल्या या पत्रावर राज्यसभा सदस्य विवेक तनखा, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव आणि जया बच्चन, आम आदमी पक्षाचे (आप) नेते राघव चड्ढा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी याशिवाय काँग्रेसचे सदस्य दिग्विजय सिंह, प्रमोद तिवारी, शक्तीसिंह गोहिल, इम्रान प्रतापगढ़ी, रणजे सिंह. रंजन, अमेय याज्ञिक आणि अखिलेश प्रसाद सिंह यांनी स्वाक्षरी केली आहे.


हेही वाचा – H3N2 चा धोका वाढला, नव्या विषाणूवर आरोग्यमंत्री काय म्हणाले? वाचा…

First Published on: March 17, 2023 1:39 PM
Exit mobile version