महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडले, संसद लोकार्पण सोहळ्यावेळी दिल्लीत राडा

महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडले, संसद लोकार्पण सोहळ्यावेळी दिल्लीत राडा

विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

नवी दिल्ली – एकीकडे संसदेच्या नवीन वास्तूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन सुरु होते. त्याचवेळी दिल्लीत धरणे आंदोलन करत असलेल्या पैलवान मुली आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री झालेली पाहायला मिळाली. पैलवानांनी बॅरिकेड्स तोडून नवीन संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर पोलिसांनी जंतर-मंतर येथील धरणे आंदोलनाचा मंडप आणि खुर्च्या हटवल्या आहेत.

पैलवानांचे आंदोलन सरकारने कशा पद्धतीने चिरले याची माहिती साक्षी मलिकने ट्विट करुन दिली आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. बृजभूषणवर तत्काळ कारवाई करावी यासाठी कित्येक दिवसांपासून भारताच्या महिला कुस्तीपटू या जंतर-मंतर येथे धरणे देत होत्या. त्यांचे आंदोलन आज चिरडण्यात आले आहे.

प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
महिला कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडणे हे देशातील सरकारचा अहंकार आणि अन्याय दाखवत असल्याची टीका, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी केली आहे.
प्रियंका गांधी यांनी पोलिसांकडून सुरु असलेली महिला कुस्तीपटूंची धरपकडचे दोन फोटो ट्विट केले आहे. त्यासोबत म्हटले आहे, “खेळाडूंच्या छातीवरील मेडल हे देशाची शान असतात. त्या मेडलने, खेळाडूंच्या मेहनतीने देशाचा मान सन्मान वाढतो.
भाजपा सरकारचा अहंकार एवढा वाढला आहे की सरकार आमच्या महिला खेळाडूंचा आवाज पोलिसांच्या बुटाखाली चिरडत आहे.
हे एकदम चुकीचे आहे. संपूर्ण देश सरकारचा हा अहंकार आणि अन्याय पाहात आहे.”

अभिनेत्री स्वरा भास्करनेही सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

First Published on: May 28, 2023 3:39 PM
Exit mobile version