शेतकरी मागे हटणार नाहीत, सरकारलाच पाऊल मागे घ्यावे लागणार – राहुल गांधी

शेतकरी मागे हटणार नाहीत, सरकारलाच पाऊल मागे घ्यावे लागणार – राहुल गांधी

कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर येथे चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती उभारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर काँक्रीटचे बांधकाम करत या भिंती उभारुन दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केली आहे. मात्र, सरकारच्या या दडपशाहीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. शेतकऱ्यांवर दबाव टाकणे, त्यांना घाबरवणे हे सरकारचे काम नाही. सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. शेतकरी मागे हटणार नाहीत. अखेर सरकारलाच पाऊल मागे घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने उशीर न लावता, त्वरित हे कायदे रद्द करण्यातच सर्वांचा फायदा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांना का धमकावत आहे?

सरकार शेतकऱ्यांना अशी वागणूक का देत आहे? सरकार शेतकऱ्यांना घाबरत आहे? मी याआधीही म्हणालो होतो की, शेतकरी आपल्या देशाची ताकद आहेत. त्यांच्यावर दबाव टाकणे, त्यांना घाबरवणे हे सरकारचे काम नाही. त्यांच्याशी चर्चा करणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हे सरकारचे काम आहे. आज दिल्लीत सर्वत्र शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी हे आपल्यासाठी काम करतात. मग असे असताना दिल्लीचे रूपांतर आता एखाद्या किल्ल्यात का करण्यात येत आहे? सरकार त्यांना का धमकावत आहे? सरकार त्यांच्याशी चर्चा का करत नाही? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले.

त्वरित कायदे रद्द करण्यात सर्वांचा फायदा

शेतकऱ्यांशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढणे गरजेचे आहे. तसे झाले तरच देशात शांतता कायम राहील. नवे कृषी कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी दर्शवली. मात्र, याचा अर्थ काय? तुम्ही हे कायदे रद्द करा किंवा करू नका. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. शेतकरी मागे हटणार नाहीत. अखेर सरकारलाच पाऊल मागे घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने उशीर न लावता, त्वरित हे कायदे रद्द करण्यातच सर्वांचा फायदा आहे, असे राहुल गांधी यांनी नमूद केले.

First Published on: February 3, 2021 4:18 PM
Exit mobile version