पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये निरंतर घट होत असूनही, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सतत वाढवल्या जात आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किंमतींवर कॉंग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीयांना किंमत मोजावी लागत आहे आणि याचा फायदा भांडवलदारांना होत आहे, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान मोदी सरकारच्या कार्यकाळातील कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा डेटा पोस्ट केला आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात १६ मे २०१४ रोजी, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०७.०९ डॉलर होती तेव्हा पेट्रोलची किमत ७१.४१ आणि डिझेलची किमत देशात प्रति लिटर ५५.४९ रुपये होती.

राहुल गांधींनी पोस्ट केलेल्या माहितीनुसार १५ जून २०२० रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ४०.६६ डॉलर असताना पेट्रोल ७६.२६ रुपये आणि डिझेल ७४.६२ रुपये प्रति लिटर किमतीने देशात विकलं जात आहे. यूपीए सरकारच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याहूनपण कमी झाल्या आहेत, पण त्यावेळी आणि आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर ४.८५ आणि १९.१३ इतका फरक आहे. या ग्राफिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कची तुलना करणारी आकडेवारी देखील दर्शविली गेली आहे. राहुल गांधींच्या या ग्राफिकानुसार १६ मे २०१४ रोजी पेट्रोलवर ९.२० रुपये तर डिझेलवर ३.४६ रुपये उत्पादन शुल्क होतं. १५ जून २०२० रोजी पेट्रोलवर ३२.९८ रुपये आणि डिझेलवर ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आहे. १६ मे २०१४ च्या तुलनेत हे अडीच ते आठपट जास्त आहे.


हेही वाचा – कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी रेल्वे तयार, ५२३१ रेल्वे डब्यांचे आयसोलेशन वार्डमध्ये रुपांतर


 

First Published on: June 15, 2020 8:56 PM
Exit mobile version