२४ ऑगस्टला राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर

२४ ऑगस्टला राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर

राहुल गांधी

कलम ३७० हटवल्यापासून जम्मू-काश्मीरमधलं वातावरण तणावपूर्णच होतं. तिथल्या अनेक भागांमध्ये जमावबंदी देखील करण्यात आली होती. मात्र, आता हळूहळू खोऱ्यातलं वातावरण पूर्वपदावर येत असल्याचं आशादायी चित्र निर्माण झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी अखेर जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. विरोधी पक्षांचं एक शिष्टमंडळ श्रीनगरला भेट देणार असून त्यामध्ये राहुल गांधी देखील असणार आहेत. त्यांच्यासोबत इतर विरोधी पक्षांमधले ९ नेते असतील अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

काँग्रेस, राजद, माकप, भाकप नेत्यांचं शिष्टमंडळ

जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करणारं विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर त्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली होती. कलम ३७० रद्द झाल्यामुळे जम्मू-काश्मीरचं नुकसान होऊन तिथली परिस्थिती अधिकच बिघडू शकते, अशी देखील शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी जम्मू-काश्मीरला जाण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, तिथली परिस्थिती पूर्वपदावर आल्याशिवाय तिथे जाता येणं शक्य नव्हतं. अखेर, आता विरोधकांची भेट शक्य होणार आहे. या शिष्टमंडळामध्ये राहुल गांधींसोबत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भाकपचे डी राजा, माकपचे सिताराम येचुरी, राजदचे मनोज झा असणार आहेत.


हेही वाचा – ‘राहुल गांधी, आधी जम्मू-काश्मीरची परिस्थिती पाहा मग बोला’

राज्यपालांना दिलं होतं आमंत्रण!

या भेटीमध्ये शिष्टमंडळातले विरोधी पक्षांचे नेते स्थानिक नेत्यांची आणि काही स्थानिकांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू-काश्मीर राज्य असताना राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर भेटीचं निमंत्रण दिलं होतं. काश्मीरमधली परिस्थिती स्वत: येऊन पाहून जा, असं आवाहन त्यांनी केलं होतं.

First Published on: August 23, 2019 9:36 PM
Exit mobile version