पक्षासाठी पाच वर्ष झटलो, गेहलोत यांनी काय केलं? – सचिन पायलट

पक्षासाठी पाच वर्ष झटलो, गेहलोत यांनी काय केलं? – सचिन पायलट

राजस्थानमधील बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई करत उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले. पायलट यांनी भाजपसोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप गेहलोत यांनी केला आहे. या सर्व घडामोडींवर पायलट यांनी मौन सोडलं आहे. सचिन पायलट यांनी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली असून यावेळी प्रथमच आपल्या नाराजीवर जाहीर भाष्य केलं आहे. पक्षासाठी पाच वर्ष झटलो, पण अनुभवाच्या आधारे अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. नाराज असतानाही राहुल गांधी यांनी आग्रह केल्यामुळे आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, असा खुलासा सचिन पायलट यांनी केला आहे.

तुम्ही अशोक गेहलोत यांच्यावर नाराज का आहात? असा प्रश्न पायलट यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पायलट म्हणाले, “मी त्यांच्यावर नाराज नाही. मी कोणतीही विशेष मागणी करत नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की काँग्रेसने निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करावी. आम्ही बेकायदा उत्खननाविरोधात आवाज उठवला होता, ज्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने वाटप रद्द केलं होतं. मात्र, सत्तेत आल्यानंतर अशोक गेहलोत त्याच मार्गावर आहेत. गेल्या वर्षी राजस्थान हायकोर्टाने एक जुना निर्णय मागे घेत वसुंधरा राजे यांना बंगला रिकामा करण्यास सांगितले, परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी गेहलोत सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. अशोक गेहलोत मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासासाठी काम करण्यासाठी जागा आणि मान काहीही देत नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझे आदेश पाळू नका असं सांगण्यात आलं आहे. कोणतीही फाइल माझ्याकडे पाठवली जात नाही. तसंच गेले कित्येक महिने मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही. जर मी लोकांना दिलेलं आश्वासन पूर्ण करु शकत नसेल तर हे पद काय कामाचं?” असं सचिन पायलट म्हणाले.

एवढं सगळा गोंधळ घालण्याऐवजी तुम्ही पक्षाच्या हाय कमांडकडे हे मुद्दे का नाही मांडले? असं पायलट यांना विचारण्यात आलं. यावर पायलट म्हणाले, “मी हा मुद्दा अनेकदा पक्षासमोर मांडला. मी राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे आणि इतर वरिष्ठ नेत्यांना याबद्दल सांगितलं होतं. शिवाय, मी अशोक गेहलोत यांच्यासमोरही हा मुद्दा मांडला होता. पण मंत्र्यांच्या कोणत्या बैठकाच होत नसल्याने चर्चा किंवा वाद-विवाद होण्याची काही संधीच नव्हती.” स्वाभिमान दुखावल्यामुळे कार्यकारिणी पक्षाच्या बैठकीत अनुपस्थित राहिल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं.

अशोक गेहलोत यांनी केलेले आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही आहे, असं सचिन पायलट म्हणाले. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. मग मी पक्षाविरोधात काम का करेन? असा सवालही त्यांनी केला आहे. आपल्या पुढील वाटचालीवर बोलताना सचिन पायलट यांनी, आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल. भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल पायलट यांना विचारण्यात आला. सचिन पायलट यांनी आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं. मी लोकांसाठी काम करत राहणार आहे. आपण कोणत्याही भाजप नेत्याची भेट घेतली नसून ज्योतीरादित्य शिंदे यांना गेल्या सहा महिन्यांपासून भेटलो नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं.

तुमच्यासाठी मुख्यमंत्री होणं इतकं महत्त्वाचं का आहे? यावर बोलताना सचिन पायलट म्हणाले, “हे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाही आहे. २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता हे खरं आहे. पक्षाच्या फक्त २१ जागा असताना मी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली होती. मी लोकांसोबत काम करत होतो. मात्र, पाच वर्षात अशोक गेहलोत यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. पण पक्ष विजयी होताच अशोक गेहलोत यांनी अनुभवाच्या आधारे मुख्यमंत्रीपदावर दावा केला. पण त्यांचा अनुभव काय आहे? १९९९ आणि २००९ असं दोन वेळा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. २००३ मध्ये ५६ तर २०१३ च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या जागा २६ वर आणल्या होत्या. तरीही त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यात आलं.”

First Published on: July 15, 2020 9:33 AM
Exit mobile version